सांगलीत वारणाली हॉस्पिटलचे बांधकाम महिनाभरात होणार सुरू; पाच कोटींचा निधी

बलराज पवार
Saturday, 24 October 2020

सांगली महापालिकेच्या बहुचर्चित वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या महिनाभरात सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सांगली : महापालिकेच्या बहुचर्चित वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या महिनाभरात सुरू होण्याची शक्‍यता आहे. आयुक्त नितीन कापडनीस यांनी याबाबतची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर ठेकेदार निश्‍चित करून बांधकामास प्रारंभ होईल. पाच कोटींचा निधी यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे दीड वर्षांत हॉस्पिटल तयार होऊन ते नागरिकांच्या सेवेत रुजू होईल, अशी शक्‍यता आहे. 

महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता असताना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेला दहा आरोग्य केंद्रे आणि कुपवाडसाठी हॉस्पिटल मंजूर झाले होते. त्यातील दहा आरोग्य केंद्रे सुरूही झाली आहेत. मात्र जागेच्या वादात वारणालीत मंजूर झालेले 50 बेडचे हॉस्पिटल रखडले होते. महापालिकेच्या स्वत:च्या जागेवर हे हॉस्पिटल मंजूर असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे.

दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदूम यांनी कुपवाड गावठाणमध्येचे हॉस्पिटल व्हावे अशी महासभेत मागणी केली. तर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने यांच्यासह काही सदस्यांनी वारणालीतच हॉस्पिटल झाले पाहिजे असा हट्ट धरला. जागेचा वाद जनतेच्या दरबारात गेला. त्यातही जनतेने वारणालीतील जागेच्या पारड्यात आपली पसंती टाकली. त्यानंतरही भाजपने वाघमोडेनगर येथे खासगी जागा विकत घेऊन तेथे हॉस्पिटल उभारणीचा ठराव महासभेत केला होता. 

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा बाजी पलटली. विष्णू माने यांनी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे वारणालीतच हॉस्पिटल होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. आयुक्त नितीन कापडनीस यांनी जागेच्या ठरावा चेंडू शासनाच्या कोर्टात टाकला. तेथे शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने हॉस्पिटलच्या जागा बदलाचा ठराव निलंबित केला. शिवाय ठराव विखंडित करण्यासाठी महिनाभरात भूमिका मांडण्यासाठी सूचनाही केली. 

दरम्यान, आयुक्त कापडनीस यांनी हॉस्पिटलचा आराखडा तयार करून त्याच्या उभारणीची निविदा जाहीर केली. यामध्ये चार कोटी 45 लाख 61 हजार 523 रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. ऑनलाईन निविदा मागविल्या असून, अर्ज भरण्याची मुदत 19 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर दुसऱ्याच दिवशी निविदा उघडून कमी दराच्या निविदेनुसार ठेकेदार निश्‍चित होणार आहे. 

आयुक्तांचा दे धक्का 
वारणालीतील हॉस्पिटलचा ठराव शासनाने निलंबित केल्यानंतर त्याबाबत महिनाभरात म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. मात्र तत्पूर्वीच आयुक्त नितीन कापडनीस यांना असलेल्या अधिकाराचा वापर करत हॉस्पिटलची इमारत बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. सत्ताधारी भाजपला त्यांचा दे धक्का आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction of Sangli Varanali Hospital will start within a month; Five crore fund