
सांगली : कोरोनामुळे ठप्प असलेला बांधकाम व्यवसाय सोमवार (ता. 20) पासून सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी "क्रेडाई'च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी बांधकामे सुरू करा; पण साईटवर निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हॅंडवॉश ठेवणे, कामगारांनी मास्क वापरणे या बाबी कटाक्षाने पाळण्याची सूचना त्यांनी केली आहे.
गेल्या महिन्यापासून महापालिका क्षेत्रातील बांधकामे ठप्प आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्यानंतर ही सर्व बांधकामे ठप्प झाली आहेत. सुमारे 500 कोटींची गुंतवणूक यामुळे अडकून पडली आहे; तर संचारबंदीमुळे बसून असलेल्या कामगारांची पदरमोड करून काळजी घेण्याचे काम बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. लॉकडाउन संपले की काम सुरू होण्याची आशा असलेल्या व्यावसायिकांना आज आयुक्तांनी दिलासा दिला.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज "क्रेडाई'च्या प्रतिनिधींशी ऑनलाईन संवाद साधला. यात क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष रवींद्र खिलारे यांच्यासह 51 व्यावसायिक सहभागी झाले होते. लॉकडाउनच्या शिथिलतेबाबत केंद्र सरकारकडून नुकत्याच मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. यात लॉकडाउनमुळे बंद असलेली बांधकामे 20 एप्रिलपासून सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.
आयुक्त कापडणीस यांनी "क्रेडाई'ला शासनाच्या सर्व आदेशांची माहिती दिली. तसेच, 20 एप्रिलनंतर जी बांधकामे सुरू होणार आहेत, त्यासाठी काय नियम आहेत याची माहिती दिली. सहभागी 51 सदस्यांनी बांधकाम सुरू करण्याबाबत शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची ग्वाही दिली. बांधकाम कामगारांना पास देण्याची मागणी केली. यावर आयुक्त कापडणीस यांनी सर्व कामगारांना आवश्यक पास दिले जातील. मात्र, शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होऊ नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली.
"क्रेडाई'चे अध्यक्ष रवींद्र खिलारे म्हणाले, की आयुक्तांनी नियम पाळून सोमवारपासून कामे सुरू करण्याची सूचना केली आहे. साईटवर जास्त कामगार न ठेवता सोशल डिस्टन्सिंग पाळून कामे सुरू होतील. तेथे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. कामगारांसाठी मास्क, हॅंडवॉश ठेवण्यात येईल. कामगारांना एकाच वेळी जेवणाची सुटी देऊ नये, अशीही सूचना आयुक्तांनी केली आहे. त्यानुसार दोन टप्प्यांत जेवणाची सुटी केली जाईल. त्यामुळे जास्त कामगार एकावेळी एकत्र येणार नाहीत, असे नियोजन करण्यात येईल.
कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल
महापालिका क्षेत्रातील बांधकामे येत्या सोमवार (ता. 20)पासून सुरू केल्यास रोजगार मिळून बऱ्याच कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. गेले महिनाभर हे कामगार बसून आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. बांधकाम व्यावसायिकांचीही कामे ठप्प असल्याने अडचण निर्माण झाली आहे. ही कामे सुरू झाल्यास कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, असे आयुक्त कापडणीस म्हणाले.
साहित्याचाही पुरवठा हळूहळू सुरू
आयुक्त नितीन कापडणीस यांनी बांधकाम सुरू करण्याबरोबरच यासाठी लागणाऱ्या साहित्याचाही पुरवठा हळूहळू सुरू करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे सर्व व्यवसाय लवकरच पूर्वपदावर येतील. तसेच, बांधकाम परवाने लवकर देण्याबाबतही चर्चा झाली. त्यातील एक टक्का विकास कर घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. परवाने लवकर दिल्यास महापालिकेलाही महसूल मिळेल.
- रवींद्र खिलारे, अध्यक्ष, "क्रेडाई', सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.