पावसाची संततधार; शासकीय रुग्णालयाच्या छताला गळती 

शैलेश पेटकर
Thursday, 6 August 2020

सांगली  येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या बाहेरी बाजूस असणाऱ्या छताला गळती लागली आहे.

सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या बाहेरी बाजूस असणाऱ्या छताला गळती लागली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी ही जागा असल्याने आता मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. दरम्यान, सर्व पक्षीय कृती समितीने शासकीय रुग्णालय प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे. 

सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, कर्नाटकमधील रुग्ण या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. दररोज पाचशेवर ओपीडी या रुग्णालयात असता. रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्ष्यात रुग्णालयाचा विस्तार वाढविण्यात आला. कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. नव्या इमारती उभारण्यात आल्या असून त्यातीही काही वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. जुन्या इमारतीची डागडुजी करण्याचे काम मात्र गेल्या काही वर्षांपासून रखडलेलेच आहे. दरम्यान, मिरजेतील शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जात असल्याने सांगलीतील रुग्णालयावर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाबाहेरी जागेतील छताला गळती लागली आहे. रुग्णालयातच पाणी साचून राहिल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनास वारंवार तक्रारी करण्यात आल्या परंतू त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी सर्व पक्षीय कृती समितीने केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 

अतिदक्षता विभागाच्या बाहेरील छताला गळती लागली असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुस्तीचे काम ठप्प असून कोट्यावधींचा निधी कोठे गायब झाला. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठातांनी याकडे लक्ष वेळ नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. 
- सतीश साखळकर, सर्व पक्षीय सिव्हिल हॉस्पिटल बचाव कृती समिती 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous rain; The roof of the government hospital leaked