ठेकेदार, अधिकारी वादात बावची आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले 

प्रमोद माने
Monday, 18 January 2021

बावची : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम ठेकेदार व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे वादात गेले दीड महिन्यापासून रखडले आहे.

बावची : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम ठेकेदार व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे वादात गेले दीड महिन्यापासून रखडले आहे. 31 डिसेंबर पर्यत हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र अद्याप काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. येथील आरोग्य केंद्राचे कामकाज इमारती शिवाय अपुऱ्या जागेत सुरु आहे. रुग्णांची गैरसोय होत आहे.नवीन सुसज्ज इमारत लवकर पूर्ण करून द्यावी अशी मागणी होत आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून येथील रुग्णालय इमारतीस एक कोटी पंच्याहत्तर लाखांचा निधी मंजूर झाला. दीड वर्षा पूर्वी बांधकाम सुरु झाले. सध्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आल आहे. फरशी व रंगकाम सुरु आहे. नवीन इमारतीत फरशी बसविणे हा अधिकारी व ठेकेदार यांच्यात कळीचा मुद्दा ठरला. प्रसूती गृह व शस्त्रक्रिया विभागातील भिंतीला पांढरी फरशी ऐवजी पिवळसर रंगाची फरशी बसविली यावरून ठेकेदार व अधिकारी यांच्यात बिनसले.यामुळे मागील दीड महिन्यापासून कामकाज थांबले आहे. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातुन पाच उपकेंद्रा मार्फत आठ गावातील सुमारे 29 हजार लोकसंख्येला रुग्णसेवा दिली जाते. दीड वर्षापूर्वी जुनी इमारत पाढली तेव्हापासून अपुऱ्या जागेत रुग्णसेवा सुरु आहे. प्रसूती गृह व शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावं लागत आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तरी इमारतीचे कामकाज लवकर पूर्ण करावे अशी ग्रामस्ताची मागणी आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contractors, officials dispute construction of Bawchi health center