राज्य संघटनांमार्फत आयोजित स्पर्धेवर क्रीडा निरीक्षकांचे नियंत्रण 

घनश्‍याम नवाथे 
Thursday, 1 October 2020

क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्र बनावटगिरीवर "सकाळ' ने वृत्त मालिकेतून टाकलेल्या प्रकाशझोतानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे.

सांगली : क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्र बनावटगिरीवर "सकाळ' ने वृत्त मालिकेतून टाकलेल्या प्रकाशझोतानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. एकविध खेळाच्या राज्य संघटनांमार्फत आयोजित राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी क्रीडा विभागाचा निरीक्षक उपस्थित राहील, असे आदेश त्यांनी परिपत्रकाव्दारे दिले आहेत. स्पर्धेनंतर 15 दिवसांत संघटनांनी निकाल संकेतस्थळावर जाहीर करावेत, 30 दिवसात सर्व कागदपत्रे विभागीय उपसंचालक व क्रीडा संचालनालयाकडे पाठवावीत, असे आदेश आहेत. 

सांगलीतील विजय बोरकर हा "ट्रॅम्पोलिन' खेळातील राष्ट्रीय स्पर्धेचे बनावट प्रमाणपत्र जोडून पोलिस उपनिरीक्षकपदावर खेळाडू म्हणून भरती झाला होता. प्रमाणपत्र फेरपडताळणीत बनावटगिरी उघडकीस आली. त्याच्यासह संघटनेचा पदाधिकारी दीपक सावंत, राज्य संघटना पदाधिकारी महेंद्र चेंबूरकर या तिघांना नुकतीच अटक झाली होती. पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्यानंतर "सकाळ'ने बनावटगिरीला झोडपून काढणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्याची कात्रणे क्रीडा प्रशिक्षकांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे पाठवली. त्यांनी गंभीर दखल घेतली. 

परिपत्रकानुसार, एकविध संघटनेच्या स्पर्धेतील प्रमाणपत्राची तसेच आदिवासी, दिव्यांग, आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या प्रमाणपत्राची छाननी विभागीय उपसंचालक करतील. त्यासाठी आयोजकांनी स्पर्धेनंतर तीस दिवसात संपूर्ण अभिलेख अध्यक्ष व सचिवांच्या सहीने पाठवावेत. तसे न झाल्यास विभागीय संचालक सात दिवस मुदत देतील. त्या वेळेत कागदपत्रे सादर न केल्यास खेळाडूंच्या भविष्यातील नुकसानीस संघटनांना जबाबदार धरले जाईल. संघटनांच्या राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर नियंत्रणासाठी क्रीडा संचालनालयाचे निरीक्षका पाठवले जातील. त्यासाठी संघटनेने स्पर्धेपूर्वी 15 दिवस अगोदर क्रीडा निरीक्षक पाठवण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी यांना कळवणे बंधनकारक असेल. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निरीक्षक पाठवण्याचा अधिकार जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी विभागीय उपसंचालकांना असेल. 

राज्याबाहेरील स्पर्धेचे नियम 
एकविध राज्य संघटनांकडून राष्ट्रीय स्पर्धा राज्याबाहेर घेतल्या गेल्यास स्पर्धेनंतर खेळाडूंची यादी, निकाल, प्रमाणपत्र तपशील आठ दिवसात क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालकांकडे पाठवणे बंधनकारक राहील. राज्यात संघटनांनी अधिकृत संकेतस्थळावर स्पर्धा, निकाल, प्रमाणपत्र आदी माहिती प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. 
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Control of sports inspectors over state-national competitions