कोरोना बिल ऑडिटचा दणका; रुग्णांना 4.87 लाख रुपये परत 

अजित झळके
Saturday, 3 October 2020

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी आकारलेल्या बिलांचे ऑडिट करून आतापर्यंत तब्बल 4 लाख 87 हजार रुपये रुग्णांना परत करण्यात आलेत. 24 रुग्णांना याचा लाभ झाला आहे.

सांगली : कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी आकारलेल्या बिलांचे ऑडिट करून आतापर्यंत तब्बल 4 लाख 87 हजार रुपये रुग्णांना परत करण्यात आलेत. 24 रुग्णांना याचा लाभ झाला आहे. "सतर्क रुग्ण, सावध प्रशासन'चा प्रत्यय आला आहे. जादा आकारलेली बिले पैसे जमा करण्याआधीच ऑडिट झाल्याने त्याची कपातही करण्यात आली असून तो आकडा पाच लाखाहून अधिक आहे. आता जुन्या बिलांचेही ऑडिट केले जाणार आहे. त्याबाबत रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. 

महापालिका क्षेत्रातील 22 रुग्णालयात 22 तर तालुका स्तरावरील 16 रुग्णालयांसाठी 16 अशा 38 लेखापरीक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या रुग्णालयाने लावलेल्या प्रत्येक बिलाचे ऑडिट करतात. याशिवाय, रुग्ण थेट या समितीकडे तक्रार करू शकतात. गेल्या काही काळात झालेल्या ऑडिटमधून काही धक्कादाकय प्रकार समोर आलेत.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गांभिर्याने तपासणीच्या सूचना दिल्यात. जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी त्यांची टीम काम करीत आहे. आतापर्यंत केवळ 24 रुग्णांच्या बिलांत दोष आढळले असले तरी पूर्वीच्या सर्व बिलांचे ऑडिट बाकी आहे. ते होत राहणार नाही. त्यामुळे रुग्णांनी बिले सांभाळून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आलेय. आतापर्यंत नियमभंग केलेल्या सर्व रुग्णालयांना कोषाधिकारी सुनिल केंबळे यांनी नोटीसा दिल्या आहेत. 

प्रतिदिन रकमेत लूट 

काही रुग्णालयांनी प्रतिदिन किती रक्कम आकारायची, याबाबत ताळतंत्र सोडल्याचे समोर आले आहे. एका रुग्णालयाने रुग्णास जनरल वॉर्डमध्ये ठेवले, त्याला ना ऑक्‍सिजन लावले ना व्हेंटिलेटर, तरी प्रतिदिन 7500 रुपये आकारले. त्याबद्दल तक्रार करण्यात आली. त्यातून ते बिल 4 हजार रुपये आकारले गेले. दिवसाला साडेतीन हजार जास्त म्हणजे दहा दिवसांचे 35 हजार झाले.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Bill audit : 4.87 lakh back to patients