कोरोना सेंटरसाठी या समाजाचा पुढाकार; 100 खाटांची व्यवस्था

शैलेश पेटकर 
Sunday, 13 September 2020

सांगलीत मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वांसाठी लवकरच 100 बेडचे हकिम लुकमान कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे.

सांगली : मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वांसाठी लवकरच 100 बेडचे हकिम लुकमान कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यासाठी येथील उर्दू हायस्कूलमध्ये युद्धपातळीवर हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू असल्याचे समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. यामध्ये 5 आयसीयू, 45 सेमी आयसीयू, 50 सामान्य बेड तर 20 संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध असणार आहेत. आठ दिवसांत हे हॉस्पिटल सुरू होणार आहे. 

ते म्हणाले, ""कोरोनाचा धोका प्रचंड वाढला असून, रुग्णांना उपचार मिळेनात. ऑक्‍जिसन, व्हेंटिलेटर्स, आयसीयूसारख्या उपचाराअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. याचाच विचार करून समाजातील सर्व बांधवांनी समाजाच्यावतीने आता शासन यंत्रणेवर अवलंबून न राहता अत्यल्प मोबदल्यात उपचाराची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये कोरोनाच्या तपासण्यांपासून ते एक्‍सरे, अँटिजेन टेस्ट, स्वॅब टेस्ट, रक्ताच्या तपासण्या सर्व काही बाजारातील दरांपेक्षा 50 टक्केपेक्षा कमी दराने केल्या जातील. ज्या रुग्णांना घरीच उपचार होऊ शकतात त्यांना घरीच अल्प दरात डॉक्‍टर घरी येऊन उपचार करतील. ज्यांना ऑक्‍सिजनपासून ते अत्यवस्थ आयसीयूपर्यंत उपचाराची गरज आहे त्यांना तपासून तेथे उपचार केले जातील. 

नगरेसवक फिरोज पठाण, उमर गवंडी म्हणाले, ""यासाठी तज्ज्ञ 4 एमडी मेडिसिन, भूलतज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ तसेच एमबीबीएस, बीएएमएस अशी 20 जणांची तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्सेस स्टाफ आदींची टीम तैनात राहणार आहे. ते 24 तास तेथे उपचार देतील. त्यासाठी समाजातील सर्व बांधवांनी खर्च करण्याची तयारी केली आहे.'' 

यावेळी खजिनदार कय्यूम पटवेगार, युनूस महात, मुश्‍ताक रंगरेज इर्शाद पखाली, अकबर शेख, हुसेब बेपारी, आयुब बारगीर, इम्रान शेख, मुन्ना शेख, लालू मेस्त्री, आयुब पटेल, टिपू इनामदार, शहानवाज फकीर, हाफिज महंमदअल्ली, हाफिज सद्दाम, साहिल खाटीक, जोएब पन्हाळकर, राजू महात, समीर मालगावे, आदिल सय्यद, मोहसीन सय्यद उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona center from the Muslim community; Arrangement of 100 beds