
मोठमोठ्या यात्रा, समारंभाना बंदी घातल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्रवासी संख्येत लक्षनीय घट झाली आहे.
इस्लामपूर (सांगली) : हळूहळू पूर्वपदावर येत असलेली लाल परी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आठ दिवस कोरोनाचा वाढत्या आलेखामुळे शासनाने धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या यात्रा, समारंभाना बंदी घातल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्रवासी संख्येत लक्षनीय घट झाली आहे. त्याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे.
इस्लामपूर आगाराचे नियमित दिवसाकाठी उत्पन्न नऊ लाखांपर्यंत होते. कोरोनाच्या कालावधीत काही काळ हे उत्पन्न पूर्णपणे बंद होते. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर यायला सुरवात झाली होती. आगाराचे उत्पन्न सहा ते सात लाखांपर्यंत वाढले. परंतु कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले आहे. त्यामुळे शासनाने काही गोष्टीवर निर्बंध आणले.
हेही वाचा - सर्वसामान्यांना आता फोडणीही झोंबणार ; खाद्यतेलाचे दरही चढेच राहणार -
मोठमोठी धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद केलीत. प्रवासीच बाहेर न पडल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळावर झाला. आजरोजी इस्लामपूर आगाराचे दिवसाकाठी उत्पन्न चार ते पाच लाखांपर्यंत खाली आले आहे. एस टी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
"कोरोनाच्या मोठ्या संकटातून बाहेर पडून पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु पुन्हा प्रसार माध्यमाद्वारे कोरोनाची वाढती अवस्था पाहता नागरिकांच्यावर त्याचा परिणाम होऊन प्रवासी प्रवास करणे टाळू लागले आहेत. कोरोना प्रतिबंध सर्व काळजीनिशी निरजंतूक एसटी बसेस सुरू आहेत. घाबरून न जाता प्रवाशांनी एसटी बसमधूनच सुरक्षित प्रवास करावा."
- शर्मिष्ठा घोलप-पाटील, आगार व्यवस्थापक, इस्लामपूर आगार
संपादन - स्नेहल कदम