कोरोनाने नऊशेचा टप्पा ओलांडला..दिवसभरात 61 नवे रूग्ण : कामेरीत पोलिसाचा मृत्यू, 13 जण कोरोनामुक्त 

घनशाम नवाथे
Friday, 17 July 2020

सांगली-  जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज नऊशेचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात दिवसभरात 61 रूग्ण आढळले. तर कामेरी (ता. वाळवा) येथे 57 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 26 रूग्ण मृत झाले आहेत. आज 13 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

सांगली-  जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज नऊशेचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात दिवसभरात 61 रूग्ण आढळले. तर कामेरी (ता. वाळवा) येथे 57 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आजअखेर 26 रूग्ण मृत झाले आहेत. आज 13 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात 34 कोरोना "पॉझिटिव्ह' रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये सांगलीत 23 रुग्ण सापडले असून एका काळी वाट परिसरात 14 रुग्ण कोरोना "पॉझिटिव्ह' सापडले आहेत. याचबरोबर मंगलमूर्ती कॉलनीतील एक होलसेल भाजी विक्रेत्यास सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. खणभाग लाळगे गल्ली, अभयनगर, गणेशनगर, अरिहंत कॉलनी या ठिकाणी सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर मिरजेत नदीवेस, कमानवेस आणि गोठण गल्ली परिसरात कोरोनाचे 11 रुग्ण सापडले आहेत. 

जत तालुक्‍यात 9 कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामध्ये जत शहरातील पाच, उमदी येथील दोन, कोंत्याव बोबलाद व गुलगुजनाळ येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. मिरज तालुक्‍यात आज सहा रूग्ण आढळले. त्यामध्ये कवलापूर येथे दोन, बिसूर, गुंडेवाडी, अंकली आणि मालगाव येथील एका रूग्णाचा समावेश आहे. वाळवा तालुक्‍यात पाच रूग्ण "पॉझिटीव्ह' असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये कामेरी येथे दोन तर पेठ, साखराळे आणि आष्टा येथे एक रूग्ण आढळला. त्यापैकी कामेरी येथील 57 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

आटपाडी तालुक्‍यात निंबवडे, पळसखेल आणि दिघंची येथील प्रत्येकी एक रूग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तासगाव, गवळेवाडी (ता. शिराळा), बांबवडे (ता. पलूस), मोहिते वडगाव (ता. कडेगाव) येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. आज दिवसभरात 13 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर 24 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यापैकी 10 जण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने नऊशेचा टप्पा ओलांडून 902 चा आकडा गाठला आहे. त्याशिवाय परजिल्हा व परराज्यातील 48 रूग्ण मिरज कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

लॉकडाऊनचा पालकमंत्री यांचा इशारा 
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ""सांगली जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. याबाबत प्रशासन खबरदारी घेत आहेत. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. कोरोना होणारच नाही असे डोक्‍यात ठेवून काही जण गर्दी करत आहेत. त्यामुळे रोगाचा फैलाव वाढतोय. आपल्या जिवाला जपा, आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे, मात्र त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही तर आम्हाला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल. त्याने कारखाने बंद होतील, रोजगार जाईल, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची अडचण होईल, आर्थिक फटका बसेल. यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्यावी.'' 
 

जिल्ह्यातील चित्र 

 • आजअखेरचे एकुण रूग्ण- 902 
 • उपचार घेत असलेले रूग्ण- 443 
 • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 433 
 • आजअखेर मृत झालेले रूग्ण- 26 
 • बाधितपैकी चिंताजनक रूग्ण- 24 
 • ग्रामीण भागातील रूग्ण- 573 
 • शहरी भागातील रूग्ण- 75 
 • महापालिका क्षेत्र रूग्ण- 254 
 • तालुकानिहाय रूग्ण- 
  आटपाडी- 79, जत- 106, कडेगाव- 46, कवठेमहांकाळ- 25, खानापूर- 27, मिरज- 59, पलूस- 58, शिराळा- 147, तासगाव- 26, वाळवा- 75, महापालिका क्षेत्र 254 
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crosses 900 mark.61 new patients in a day: Policeman dies in Kameri, 13 released from corona