कोरोना देतोय गावकीच्या भांडणाला फोडणी !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आटपाडी (सांगली) ः कोरोनाच्या टाळेबंदीत सवलत मिळताच पुण्या-मुंबईसह परराज्यातून शेकडो मुलनिवासी आता गावाकडे परततत आहे. मात्र गावात आल्यानंतर गावकीतील जुन्या वादांना फोडणी मिळत आहे. अलगीकरण कक्षात राहण्यावरून गावकारभाऱ्यांशी त्यांचे वाद होत असून हे वाद मिटवणे हा पोलिसांसाठी नवाच उद्योग झाला आहे.

आटपाडी (सांगली) ः कोरोनाच्या टाळेबंदीत सवलत मिळताच पुण्या-मुंबईसह परराज्यातून शेकडो मुलनिवासी आता गावाकडे परततत आहे. मात्र गावात आल्यानंतर गावकीतील जुन्या वादांना फोडणी मिळत आहे. अलगीकरण कक्षात राहण्यावरून गावकारभाऱ्यांशी त्यांचे वाद होत असून हे वाद मिटवणे हा पोलिसांसाठी नवाच उद्योग झाला आहे.
आटपाडी तालुक्‍यातील हजारो जण नोकरी, उद्योग-व्यवसाय निमित्त पुणे, मुंबई शहरात आणि देशभर गेले आहेत. कायद्याने आला की क्वारंटाईन आणि तसाच आला तर मोकाट अशी तक्रार अनेकांची आहे. मात्र विनापरवाना आलेले आटपाडी गाव आणि परिसरात मोकाट फिरत आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करावे यासाठी गावागावात ग्रामपंचायत, दक्षता समिती आणि बाहेरून आलेल्या लोकांत प्रचंड टोकाचे वाद आणि संघर्ष होऊ लागले आहेत. ग्रामपंचायत आणि दक्षता समितीना पोलीस- प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.
सध्या तालुक्‍यात 1107 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. अनेकांच्या हातावर शिक्के मारूनही ही मंडळी बाहेर फिरत आहेत. ग्रामपंचायत आणि दक्षता समितीच्या आवाहानला ते प्रतिसाद देत नाहीत. यावरून अनेक गावात प्रचंड टोकाचे वाद आणि संघर्ष सुरु आहेत. अनेक ठिकाणी संबंधित व्यक्ती, स्थानिक राजकारण आदीवरून त्याला क्वारंटाईन करणे आणि त्यात सवलत देणे असे प्रकार सुरु आहे. या प्रकाराला राजकीय वळण लागले आहे. पळसखेल आणि देशमुखवाडी गावात यावरून प्रचंड वाद झाला आहे. अनेक ग्रामपंचायतीने प्रशासनाला संबंधित लोकांची माहिती कळवली आहे तरीही त्याची दखल घेतलेली नाही. पळसखेल ग्रामपंचायत आणि दक्षता समितीने यासंदर्भात बाहेरून आलेल्या लोकांची माहिती महसूल प्रशासनाला लेखी दिली. महसूल विभागाने ही पोलिसांना यासंदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मात्र त्याची अंमलबजावणीस टाळाटाळ सुरु आहे. गावागावात बाहेरून आलेली मंडळी आणि मूळची गावातील मंडळी यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is giving a break to the village quarrel!