जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम; नवे रुग्ण 936; मृत 23

जयसिंग कुंभार
Sunday, 13 September 2020

सांगली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवे 936 कोरोनाचे रुग्ण आढळले, तर दिवसभरात 754 जण कोरोनामुक्त झाले.

सांगली : जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवे 936 कोरोनाचे रुग्ण आढळले, तर दिवसभरात 754 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यानंतर रुग्णसंख्याही वाढत आहे. जिल्ह्यात आज 23 बाधितांना मृत्यूने गाठले. 

जिल्ह्याबरोबरच महापालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढता आहे. महापालिका क्षेत्रात आज नव्या 346 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजपर्यंत केवळ महापालिका क्षेत्रातील बाधितांचा आकडा आता 10 हजारांहून अधिक झाला आहे. आज दिवसभरात आरटीपीसीआर 2216 चाचण्यांपैकी 535 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. अँटिजेन 1053 पैकी 437 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. 

जिल्ह्यातील 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तोंडोली (कडेगाव), विटा, माडग्याळ, काशीदवाडी, कांचनपूर, पुणदी (पलूस), आटपाडी, ऐतवडे खुर्द, अंजनी, कवलापूर, आमणापूर, सुभाषनगर, हिंगणगाव, कवलापूर, आटपाडी येथील रुग्णांचा; तसेच सांगली शहरातील सहा, तर मिरजेतील एकाचा समावेश आहे. परजिल्ह्यातील हासूर (शिरोळ) आणि कऱ्हाड येथील दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 22 हजार 306 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यातील चित्र 

 • आजअखेरचे पॉझिटिव्ह रुग्ण- 22306 
 • सध्या उपचार घेणारे रुग्ण- 9109 
 • आजअखेर बरे झालेले रुग्ण-12376 
 • आजअखेर जिल्ह्यातील मृत- 821 
 • पॉझिटिव्हपैकी चिंताजनक- 961 
 • आजअखेर ग्रामीण रुग्ण-9324 
 • आजअखेर शहरी रुग्ण-2851 
 • महापालिका क्षेत्र रुग्ण- 10131 
   
 • संपादन : युवराज यादव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona increased in the district; 936 new patients; Dead 23