कोरोना बाधितांच्या कुटुंबियांना तपासणीसाठी ठेवले सात तास ताटकळत 

जयसिंग कुंभार
Saturday, 8 August 2020

कोरोना बाधिताच्या कुटुंबातील दहा जणांना गुरुवारी सकाळी 12 वाजता संशयित रुग्ण म्हणून तपासणीसाठी बोलवण्यात आले.

सांगली : कोरोना बाधिताच्या कुटुंबातील दहा जणांना गुरुवारी सकाळी 12 वाजता संशयित रुग्ण म्हणून तपासणीसाठी बोलवण्यात आले. दोन तास सारे ताटकळत बसल्यानंतर डॉक्‍टर दुपारी तीन वाजता येणार असे सांगण्यात आले. पुन्हा सारे घरी आले. त्यानंतर पुन्हा तीन वाजता सारे तिथेच गेले. त्यांच्या चाचण्या करण्यासाठी रात्रीचे पावणेसात वाजले. जणू प्रशासनाने या सर्व कुटुंबियांना सुमारे सात तास ताटकळत ठेवण्याची शिक्षाच फर्मावली. 
नळभागातील एका कुटुंबाला हा अनुभव. लहान मुले आणि महिलांसह दहा जण दिवसभर केवळ डॉक्‍टरांची प्रतिक्षा करीत येथील कर्मवीर चौकातील सैनिक संकुलातील केंद्रावर बसले होते. तिथे किमान आधीच पन्नास साठ अशाच संशियतांची गर्दी होती. त्या गर्दीतच दिवसभर लहान मुले वावरत होती. कोरोना गाठतो की काय या भितीच्या छायेत सात तास या सर्वांसाठी जणू कारागृहाचा अनुभव देणारे ठरले. 

महापालिकेच्या गलथान कारभाराबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. तीन वाजता डॉक्‍टर येणार होते तर हे आधीच त्या कुटुंबियांना का सांगण्यात आले नाही? संशयित रुग्णांना दिवसभर शहरातून फिरायला लावणे कितपत योग्य? मुळात रुग्णांच्या मते संबंधित डॉक्‍टर आधीच दोन तास केंद्रावर आल्या होत्या मात्र त्यांनी तपासणीच्या कामाला सुरवात करायलाच तेवढा वेळ घेतला. हा सारा संताप आणणारा प्रकार. याबद्दल कोणी कोणाला जाब विचारायचा? 

महापालिका क्षेत्रात आता कोविड तपासणीची नव्याने केंद्रे सुरु केली आहेत. तिथे ऐच्छिक तपासणी आणि रुग्णांच्या नातलगांची संशयित तपासणी यात फरक केला पाहिजे. संशयितांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांना आधीच वेळा देऊन बोलवले जावे. आल्यानंतर शक्‍य तेवढ्या लवकर चाचण्या करून त्यांना मुक्त केले तर संसर्गाचा धोका कमी होईल. तर कंटेमेंट झोन, क्वारंटाईन अशा उपाययोजनांचा काही तरी फायदा होईल. अन्यथा पत्रे ठोकून बिले काढणे एवढाच त्याचा उपयोग होईल. कोरोना बाधितांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मानसिकतेचा विचार महापालिका प्रशासनाने करायला हवा. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona kept the families of the victims under investigation for seven hours