कोरोनामुळे साहित्याचा ऑनलाईन आस्वाद... साहित्यरचनांना मिळतेय चालना

अजित कुलकर्णी
Friday, 25 September 2020

कोरोनासोबतच जगायचे हा विचार प्रबळ झाल्यानंतर आता ऑनलाईन संमेलने आकारास येत आहेत. कार्पोरेट जगतात सेमिनार, वेबिनार असल्या न कळणाऱ्या शब्दांची भाषाही आता साहित्यिक आत्मसात करत आहेत.

सांगली : कोरोनामुळे सभा, संमेलने, मेळाव्यासह अन्य व्यवहार ठप्प झाल्यानंतर साहित्य चळवळ लॉक होते की काय, अशी भिती होती. मात्र कोरोनासोबतच जगायचे हा विचार प्रबळ झाल्यानंतर आता ऑनलाईन संमेलने आकारास येत आहेत. कार्पोरेट जगतात सेमिनार, वेबिनार असल्या न कळणाऱ्या शब्दांची भाषाही आता साहित्यिक आत्मसात करत आहेत. कथा, कविता, कादंबरी, ग्रंथ मोबाईलवर उपलब्ध आहेतच. आता त्यासोबत लिहणाऱ्या हातांचा सर्वांसमोर व्यक्‍त होण्यासाठी ऑनलाईन दरबार भरत असल्याचे चित्र दिसत आहेत. 

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचे वैश्‍विक संकट घोंगावते आहे. यामबध्ये जगणे समृध्द करणारे साहित्य "लॉक' झाले. संचार स्वातंत्र्यावर लॉकडाउनची गदा आल्याने थांबल्याने कवी, साहित्यिकही घरीच थांबले. त्यामुळे कोंडी झाली असली तरी लिखाणाला लागणारी बैठक पक्‍की झाली. घरीच ठाण मांडून बसल्याने कल्पनाशक्‍तीला चालना मिळत गेली. त्यातून एकाहून एक सरस रचना कागदावर येत आहेत. समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी मोबाईल साक्षर होणे महत्वाचे वाटू लागले.

फेसबुक, व्हॉटस ऍपच्या ग्रुपवर टाळेबंदीच्या काळात हजारो रचना येत होत्या. त्यात आपलाही सहभाग हवा, अशी उर्मी जुन्या किंवा या नव्या माध्यमांपासून दूर असणाऱ्या मंडळींना वाटू लागली. मुले, नातवंडांकडून मोबाईल साक्षर होता होता केलेल्या रचना स्क्रिनवर झळकू लागल्याचे समाधार औरच वाटत आहे. अनेक मंडळींनी असे ग्रुप,पेज, ऍप तयार करुन त्या माध्यमातून शेअरिंग सुरु केले आहे. त्यावर लाईक, शेअर व फॉरवर्डचे धूमशान सुरु असते.

पसंतीच्या साहित्यिकांना "फॉलो' करताना त्यांच्याशी संवादही साधण्याची संधी झूम किंवा गुगल मीट ऍपच्या सहाय्याने मिळत आहे. पूर्वी केवळ पाठ्यपुस्तकात दिसणारे साहित्यिक व त्यांच्या रचना आता ऑनलाईनमुळे "याची देहि...याची डोळा' बघण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. 

सोशल मिडियावर धडपडीमुळे साहित्यचळवळीला बळकटी

लिखित माध्यमांसह आता ऑनलाईन लिहणाऱ्या मंडळींचे प्रमाण लॉकडाउनच्या काळात वाढले आहे. विशेषत: तरुण वर्गाने आपल्या अभिरुची जोपासताना साहित्याला दिलेले महत्त्व वाखाणण्यासारखे आहे. गर्दीसमोर आपल्या रचना सादरीकरणाचा एक वेगळा आनंद असतो. कोरोना महामारीमुळे त्या आनंदाला पारखे झाल्याची खंत आहे. सोशल मिडियावर व्यक्‍त होण्यासाठी सुरू असणाऱ्या धडपडीमुळे साहित्य व सांस्कृतिक चळवळीला बळकटी मिळेल, अशी आशा आहे. 
- दयासागर बन्ने, साहित्यिक, सांगली 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona makes literature available online ... Literature works