
कोरोना संकटात आरोग्य व्यवस्था या काळात "देवदूत' बनून पुढे आली आणि पायाभूत सुविधा, प्रथमोपचारासाठीची अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी केल्याने ती आत्मनिर्भर झाली आहे.
सांगली ः कोरोना ही जागतिक आपत्ती होती आणि आहे. त्यातून खूप काही वाईट घडून गेले, मात्र या संकटाने काही गोष्टींत आपणास आत्मनिर्भर व्हायला लावले. जिल्ह्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणाही या संकटात तावून-सुलाखून निघाली. अन्य शासकीय विभागांप्रमाणे अडगळ ठरण्याची भीती असलेली आरोग्य व्यवस्था या काळात "देवदूत' बनून पुढे आली आणि पायाभूत सुविधा, प्रथमोपचारासाठीची अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी केल्याने ती आत्मनिर्भर झाली आहे.
जिल्ह्यात 59 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 320 उपकेंद्र आहेत. येथे रिक्त जागा, अडगळीच्या इमारती, लोकांचा उडालेला विश्वास, कामचुकार कर्मचारी अशी अनेक तक्रारींची यादी होती. काही केंद्रांचे काम गौरवास्पद होते, मात्र तरीही सुधारणेला बराच वाव होता. कोरोना संकटाने त्या सुधारणांची संधी दिली. त्यातून ही यंत्रणा आता सक्षम झाली आहे. 320 उपकेंद्रांसाठी 305 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आल्याने ही केंद्रे आता पूर्णवेळ रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची जवळपास 38 रिक्त पदे भरण्यात आल्याने तेथील ताणही कमी झाला आहे. आपत्तीत आरोग्य यंत्रणेने दाखवलेले धैर्य आणि शहरांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी पत्करलेली जोखीम नेहमीच कौतुकाचा विषय राहील.
260 ऑक्सिजन सिलिंडर
जिल्ह्यातील 59 प्राथमिक आरोग्य केंद्रांत जिल्हा परिषदेकडून तब्बल 260 ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. आता प्रत्येक केंद्रात जवळपास चार सिलिंडर आहेत आणि अचानक एखाद्या रुग्णाला श्वसनाचा त्रास व्हायला लागला तर त्याच्यावर तत्काळ प्राथमिक उपचाराची सोय या केंद्रांमध्ये उपलब्ध झाली आहे. यानिमित्ताने ही यंत्रणा कशी हाताळायची याचे ज्ञान डॉक्टरांसह सहायक टीमला मिळाले आहे.
ऑक्सिमीटर हाती
तुमची ऑक्सिजन लेव्हल किती आहे? 95 पेक्षा जास्त आहे ना? मग काही काळजी करू नका... हे शब्द कुणा डॉक्टरांचे नाहीत. हे सामान्य माणूसही आता सांगू लागला आहे. कोरोना संकटाने त्यांचाही अभ्यास झालाय. जिल्ह्यात आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा वकर्स यांच्याकडे तब्बल 2 हजार 500 इतक्या मोठ्या संख्येने ऑक्सिजन मीटर पुरवण्यात आले आहेत.
ताप तपासणी
एखाद्याला ताप आलाय तर तो किती आहे, हे सांगण्यासाठी डॉक्टरांकडेच जावे लागत होते. आता तुम्हाला ताप आहे की नाही हे सांगायला गावात डॉक्टरांसह आशा वर्कर्स, शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायतचे कर्मचारीही समक्ष आहेत. त्यांच्याकडे तापमापन यंत्रे उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात शासकीय पातळीवर तब्बल 2 हजार 500 यंत्रे देण्यात आली असून, खासगी माध्यमातून तेवढीच यंत्रे गावखेड्यात कार्यरत आहेत.
रुग्णवाहिका खरेदी
जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आरोग्य सभापती आशा पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी थेट नव्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 लाखांला एक याप्रमाणे 14 रुग्णवाहिका खरेदी केल्या जात आहेत. 14 व्या वित्त आयोगातून ही खरेदी होत आहे. आणखी रुग्णवाहिका खरेदी करून ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम केली जाणार आहे.
कोरोना संकटात या यंत्रणेने खूप चांगले काम केले
आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणाचा सर्वच सदस्यांचा आग्रह राहिला आहे. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी, रिक्त जागांवर भरती, लोकांना उत्तम सेवा देता याव्यात यासाठीचे नियोजन अगदी काटेकोर सुरू आहे. कोरोना संकटात या यंत्रणेने खूप चांगले काम केले.
- प्राजक्ता कोरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
आरोग्य यंत्रणा सक्षम करणे याला प्राधान्य
ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करणे याला माझे प्राधान्य आहे. कोरोना संकटात त्याला अधिक गती देता आली. आमची यंत्रणा चांगले काम करते आहे.
- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी
संपादन : युवराज यादव