
कोरोनाला रोखायचंय ? हे पाळा!
बेळगाव : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात शाळा सुरळीतपणे सुरु राहाव्यात यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करुन नियमावली जाहीर केली आहे. त्याचे सर्व विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे यंदा शाळांना लवकर सुरवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष व्यवस्थित सुरु झाले आहे. मात्र, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे, धोक्याची टांगती तलवार आहे. बंगळूरमधील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याचे गांभिर्य वाढले आहे.
साहजिकच सर्वत्र भितीचे वातावरण आहे. शिक्षण खात्यानेसुद्धा ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यासाठी मार्गसूची जाहीर करण्यात आली असून त्याचे पालन करण्याची सूचना केली आहे. मार्गसूचीचे पालन केल्यास विद्यार्थ्यांना कोरोनापासून दूर ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे, मार्गसुचीनुसार शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करावी लागणार आहे. पुन्हा कोरोना वाढू लागल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांवरील जबाबदारीही वाढली आहे. सर्व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. शिक्षण खात्याच्या नियमावलीनुसार वर्गखोल्यांची स्वच्छता करण्यासह इतर प्रकारची कामे हाती घेण्यात घ्यावी लागणार आहेत. माध्यान्ह आहार व दूध वाटप करतानाही विशेष काळजी घ्यावी लागणार. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होऊ नये.
त्यांच्यात सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांना अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. एकदा शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा ब्रेक लागू नये यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना कोरोना नियमावली पाळावी लागणार आहे.
शिक्षण खात्याने जाहीर केलेली मार्गसूची
कोरोनाबाबत विद्यार्थ्यांना रोज मार्गदर्शन करावे
विद्यार्थ्यांनी घरातून शुद्ध पाणी घेऊन यावे
१२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांनच्या लसीकरणाबाबतची माहिती संकलित करावी
लस न घेतलेल्यांना लसीकरणाची सूचना करावी
एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास तातडीने आरोग्य विभागाला माहिती द्यावी
दहापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास वरिष्ठांशी चर्चा करुन शाळेला दोन-तीन दिवस सुट्टी जाहीर करावी
संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करावे
शिक्षकांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेले असावेत
विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावेत
पालकांशी सातत्याने संवाद ठेवावा
Web Title: Corona Outbreak To Stop Corona Follow This Rule Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..