हे राम...श्रीरामपुरात आढळला कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

तो बाधित असल्याचे समजल्यावर जिल्हा प्रशासन सावध झाले आहे. तो नेमका कोणाच्या संपर्कात आला होता. आणि नेमकी ही बाधा कशी झाली याचा शोध घेतला जात आहे. हा तरूण कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधिताचा आकडा बावीसवर गेला आहे. दोघांचा अंतिम अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज एका किंवा दोघाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहे. रिपोर्ट आल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होते. त्यामुळे यंत्रणेवरही ताण येतो. आणि संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांनाही धास्ती बसते. जामखेड, संगमनेर, नेवासा तालुक्यातील कोरोनाची बाधा श्रीरामपूर तालुक्यातही झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील तरूण कोरोनाबाधित झाला आहे. त्या तरूणाच्या संपर्कात नेमकी कोणती व्यक्ती आली होती. याचा शोध जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे. ग्रामीण रुग्णालयाचे पथक त्या गावात जाऊन शोध घेणार आहे. कोरोनाबाधित रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. त्याचा अहवाल अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला. त्यांनी तहसीलदारांना अवगत केले.

रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला तरूण हा दिव्यांग असल्याचे समजते. त्याला चक्कर आल्याने रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे केलेल्या तपासणीदरम्यान तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

तो बाधित असल्याचे समजल्यावर जिल्हा प्रशासन सावध झाले आहे. तो नेमका कोणाच्या संपर्कात आला होता. आणि नेमकी ही बाधा कशी झाली याचा शोध घेतला जात आहे. हा तरूण कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधिताचा आकडा बावीसवर गेला आहे. दोघांचा अंतिम अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient found in Shrirampur taluka