कोरोना रूग्णांना दिली जाणार कथा, कादंबरी, विनोदी पुस्तके 

अजित कुलकर्णी 
Tuesday, 11 August 2020

रुग्णांना क्‍वारंटाईन काळात छंद जोपासण्यासाठी एक "गुड न्यूज' आहे. येथील आयुष सेवाभावी संस्थेने क्‍वारंटाईन रुग्णांना वाचण्यासाठी प्रेरणादायी कथा, कादंबरी, विनोदी पुस्तके देण्याचा "हट के' उपक्रम राबवला आहे.

सांगली : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने लोक अस्वस्थ होत असल्याचे चित्र आहे. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांची भितीने गाळण उडते. मात्र रोगप्रतिकारक शक्‍ती चांगली असेल तर कोरोना विषाणूचा टिकाव लागू शकत नसल्याने अनेकजण तसे "रिलॅक्‍स' असतात. अशा रुग्णांना क्‍वारंटाईन काळात छंद जोपासण्यासाठी एक "गुड न्यूज' आहे. येथील आयुष सेवाभावी संस्थेने क्‍वारंटाईन रुग्णांना वाचण्यासाठी प्रेरणादायी कथा, कादंबरी, विनोदी पुस्तके देण्याचा "हट के' उपक्रम राबवला आहे. राज्यात असा पहिलाच उपक्रम सांगलीत सुरु होत असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. 

गेल्या महिन्याभरात सांगली शहरासह महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येते. रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही अनेकजण रोगप्रतिकारक शक्‍तीच्या जोरावर कोरोनावर मात करत आहेत. 14 दिवसांचा क्‍वारंटाईन कालावधीत करायचे काय, मोबाईलमध्ये किती वेळ मन रमवणार, असाही प्रश्‍न आहेच.

भेटणे, बोलणे, गप्पा-टप्पा तर दूरच; त्यामुळे खचलेल्या मनाला उभारी मिळायला साधनच नसते. ही गरज ओळखून आयुष संस्थेने लोकांकडून अडगळीत पडलेली पुस्तके घेउन ती रुग्णांना देण्याची संकल्पना पुढे आणली. अनावश्‍यक, जुनी झालेली पुस्तके दान स्वरुपात देण्याचे आवाहन संस्थेने सोशल मिडियामार्फत केले आहे. शांतिनिकेतन, भोकरे महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, राजमती भवनातील कोरोना रुग्णांना ती देण्यात येणार आहेत. 

500 पुस्तकांचा हजार लोकांना लाभ... 
क्‍वारंटाईन काळात वेळ जात नसल्याची समस्या असते. त्यावर वाचन हा प्रभावी तोडगा निघू शकतो, हे लक्षात येताच लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्याचे ठरले. संस्थेने स्वखर्चातून सुमारे 500 पुस्तके गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 
राज्यात प्रथमच कोरोना रुग्णांसाठी वाचनाचा आनंद मिळवून देत किमान हजार लोकांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न असेल. 
-गणेश आनंदे, आयुष सेवाभावी संस्था. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients will be given stories, novels, comic books