अहो आश्‍चर्यम्‌ ः चार तासांत पॉझिटिव्ह महिला निगेटिव्ह झाली 

अजित झळके
Sunday, 9 August 2020

या कोरोनाचं काही कळेचना बुवा, अशी सर्वत्र परिस्थिती झाली आहे. नवरा पॉझिटिव्ह, बायको निगेटिव्ह... एकाच टेबलवर काम करणाऱ्यापैकी एक पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह... इथंपर्यंत ठीक होतं. पण, चार तासांच्या आत एक पॉझिटिव्ह असलेली महिला निगेटिव्ह आल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे

सांगली ः या कोरोनाचं काही कळेचना बुवा, अशी सर्वत्र परिस्थिती झाली आहे. नवरा पॉझिटिव्ह, बायको निगेटिव्ह... एकाच टेबलवर काम करणाऱ्यापैकी एक पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह... इथंपर्यंत ठीक होतं. पण, चार तासांच्या आत एक पॉझिटिव्ह असलेली महिला निगेटिव्ह आल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिराळा तालुक्‍यातील बिळाशी येथील या महिलेचा अहवाल चार तासांत पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. या एकूण प्रकाराबद्दल त्या महिलेच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

याबाबत संबंधित महिलेच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी ः सदर महिला 60 वर्षे पार केलेली आहे. त्यांना हलका ताप आणि सर्दी होती. संशय नको म्हणून त्यांनी शासकीय यंत्रणेला कळवले आणि त्यांच्या माध्यमातून तपासणी करून घेण्यात आली. पहिली तपासणी मिरजेतील शासकीय कोरोना रुग्णालयातून झाली. ती पॉझिटिव्ह आली. कोरोना झाल्याचे समजल्यानंतर महिलेला धक्का बसला. कुटुंबियांनी धीर दिला. शासकीय रुग्णालयात उपचार करण्याऐवजी एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पुन्हा एकदा तपासणी करून घेऊ, असे सांगितले. कुटुंबियांनी तयारी दर्शवली. ती केली...

धक्कादायक म्हणजे ती निगेटिव्ह आली. या महिलेला कोरोना झालाच नाही, असे स्पष्ट झाले. कुटुंबिय गोंधळात पडले. आधीचा अहवाल खरा मानायची की नवा... पॉझिटिव्ह की निगेटिव्ह... काय करायचे? उपचार कसले घ्यायचे. रुग्णालयात थांबायचे की घरी जायचे... की क्वारंटाईन व्हायचे. काय करावे, गोंधळ... गोंधळ... गोंधळ. 
अखेर डॉक्‍टरांनी मार्ग काढला. एक दिवस रुग्णाला भरती करून घेतले. त्यांच्यावर उपचार केले. त्यांचा ताप आणि सर्दी कमी झाली. त्यानंतर लगेच त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी यानिमित्ताने काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. आधीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होता, तो ग्राह्य माणून कोरोनाचे उपचार केले असते आणि त्यामुळे रुग्णावर विपरीत परिणाम झाला असता तर जबाबदार कोण होते? या एका प्रश्‍नाभोवती व्यवस्था गंभीर आहे की नाही, या प्रश्‍नाचे मोठे चक्रव्यूह तयार होते. ते भेदले जात नसल्यानेच सध्या कोरोनाबाबत प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे चाललेय का? हा सवाल उपस्थित होतोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive woman got negative in four hours