सात आमदारांना कोरोना, कार्यकर्ते चिंतेत; कुठे वाचा

अजित झळके
Monday, 7 September 2020

सांगली जिल्ह्यातील तब्बल सात आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. माजी खासदार, माजी आमदार आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना कोरोनाने झटका दिला आहे.

सांगली ः जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या प्रचंडा वेगाने वाढत असताना राजकीय क्षेत्रातील मान्यवरही कोरोनाने बेजार झालेत. जिल्ह्यातील तब्बल सात आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. माजी खासदार, माजी आमदार आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना कोरोनाने झटका दिला आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास नेत्यांनीही दक्षता घ्यावी, घरी थांबावे, बैठकांना हजेरी लावू नये, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे. 

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामाला लागलेत. अन्य आमदारांवर सध्या उपचार सुरू आहेत. आमदार खाडे आणि गाडगीळ सध्या घरी थांबून उपचार घेत आहेत. श्री. खोत कोरोनामुक्त होऊन आंदोलनातही उतरले. त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. सांगलीचे माजी महापौर हारुण शिकलगार यांचा कोरोनाने धक्कादायक मृत्यू झाला. ही सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी पाच सहा महिन्यांपासून कोरोनाच्या लढाईत मैदानात उतरून काम करीत आहेत.

कोरोनाचे संकट गडद होत असताना रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याचे महाकाय आव्हान जिल्ह्यासमोर आहे. या काळात सर्व राजकीय नेते पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्‍यात विधानसभा क्षेत्रांमध्ये कोविड रुग्णालय उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. अशा आव्हानात्मक काळात या नेत्यांना घरी आणि रुग्णालयात थांबून उपचार घ्यावे लागत असल्याने कार्यकर्त्यांत काहीसे चिंतेचे वातावरण आहे. 

दोन्ही मंत्री "हाय रिस्क' मध्ये 

पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम सातत्याने कोरोनाविरोधातील नियोजनासाठी मैदानात आहेत. त्यांच्याभोवती लोकांचा गराडा असतो. तेही हाय रिस्कमध्ये काम करीत आहेत. अशावेळी कोणत्याही नेत्याला, कार्यकर्त्याला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यांनी घरीच थांबावे, सार्वजनिक ठिकाणी वावर थांबवावा, असे आवाहन सातत्याने पक्षांकडूनही केले जात आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to seven MLAs in Salgali District; activists worried