सांगलीतील कोरोना स्थिती चिंता वाढविणारी : मुख्यमंत्री ठाकरे... "व्हीसी'वरून सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्राचा घेतला आढावा

विष्णू मोहिते
Friday, 4 September 2020

सांगली-  मुंबई, ठाण्याकडून कोरोनाचा फोकस आता सांगली, सातारा, कोल्हापूरकडे सरकल्याचे दिसत असून, सांगलीतील स्थिती चिंता वाढवणारी आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. त्यांनी आज पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या वेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते. 

सांगली-  मुंबई, ठाण्याकडून कोरोनाचा फोकस आता सांगली, सातारा, कोल्हापूरकडे सरकल्याचे दिसत असून, सांगलीतील स्थिती चिंता वाढवणारी आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. त्यांनी आज पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या वेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या वेळी जिल्ह्यातील कोरोना स्थिती व उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही आढावा दिला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ""पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण मागील चुका टाळून पुढे गेले पाहिजे. गणेशोत्सव, मोहरमनंतर आता दसरा, दिवाळी असे सण आणि त्या ओघाने येणारा प्रशासकीय ताण पाहता आव्हाने समजून वाटचाल केली पाहिजे. हा आपल्या सर्वांचा कसोटीचा काळ आहे. सुविधा द्याच; पण काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील.'' 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ""चेस द व्हायरस ही मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहायक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देऊन कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबवा. ही केवळ तपासणी नसेल, तर घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का, त्यांचे आरोग्य कसे आहे, त्यांना न्यूमोनियासदृश काही लक्षणे आहेत का, बाहेरून कुणी व्यक्ती घरात आले आहेत का, मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का, याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल, याकडे लक्ष द्या.'' 
या वेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. व्यास, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. 

जबाबदारीने काम करा ! 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ""कोरोनाविरोधातील लढ्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. सुविधांची कमतरता भासेल तिथं माझ्याशी बोला. शासन पूर्ण ताकदीने पाठीशी राहील. मात्र, कुचराई करू नका, गाफील राहू नका. सुविधा वापरायची वेळच येणार नाही, अशा जबाबदारीने काम करा. विषाणूला घराबाहेरच रोखा. धार्मिक स्थळे उघडण्यासाठी विनंत्या होत आहेत. मात्र, त्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona situation in Sangli raises concerns : CM Thackeray. "VC 'reviews Sangli and Western Maharashtra