दुर्दैवी : कोरोना संशयित वृध्देला हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारला, वाचा कुठे घडली घटना

बलराज पवार
Sunday, 12 July 2020

मिरज सिव्हीलमध्ये दाखल करण्यासाठी आणलेल्या कोरोना संशयित 75 वर्षीय महिलेस रुग्णवाहिकेतच दोन तास उपचाराअभावी ताटकळत पडावे लागले.

सांगली : मिरज सिव्हीलमध्ये दाखल करण्यासाठी आणलेल्या कोरोना संशयित 75 वर्षीय महिलेस रुग्णवाहिकेतच दोन तास उपचाराअभावी ताटकळत पडावे लागले. जिल्हा शल्य चिकित्सकांसह कोणीही तक्रार करूनही लक्ष दिले नाही. उलट खाटा नसल्याचे सांगून त्यांना अन्य दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप नगरसेवक अभिजित भोसले यांनी केला. शासकीय यंत्रणेचा अनागोंदी कारभार सुरू असून याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

ते म्हणाले, हनुमान नगरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास एक 75 वर्षीय महिला तब्येत बरी नसल्याने रस्त्याकडेला पडली होती. ती कोरोना संशयित असल्याचे दिसू लागल्याने महापालिकेची रुग्णवाहिका बोलावून मी स्वत: व कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून तिच्या नातेवाईकांसमवेत तिला मिरज सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी हलवले.

मात्र दुपारी अडीचपासून साडेचारपर्यंत कोणीही तिला पहायला आले नाही. 
याबाबत संबंधित यंत्रणेला नगरसेवक भोसले यांनी धारेवर धरल्यावर, कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर तिला खाटा शिल्लक नसल्याचे सांगत कोणताही उपचार न करता अन्य दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. 

भोसले म्हणाले, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे याबाबत तक्रारीसाठी वारंवार फोन केले. पण त्यांनी फोन घेतला नाही. अखेर उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मिरज रस्त्यावरील हॉस्पिटलमध्ये तिला आयसोलेशन विभागात उपचारासाठी दाखल केले. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याप्रकरणी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona suspected old woman refused to admit in hospital at civil