कोरोनाची लस प्रथम वैद्यकीय क्षेत्राला : नव्या वर्षात लस मिळणार; ऑनलाईन नोंदणी सुरू

अजित झळके
Wednesday, 28 October 2020

नव्या वर्षात कोरोना प्रतिबंधक लस येईल, असे संकेत राज्य शासनाकडून मिळाले आहेत. ही लस पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला प्राधान्याने दिली जाईल.

सांगली : नव्या वर्षात कोरोना प्रतिबंधक लस येईल, असे संकेत राज्य शासनाकडून मिळाले आहेत. ही लस पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला प्राधान्याने दिली जाईल. त्यांची संख्या निश्‍चित करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते. 

श्री. डुडी म्हणाले,""जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण होईल. त्यात डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, सहकारी कर्मचारी, रुग्णवाहिका कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, आशा वर्क अशांचा समावेश असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. त्यानंतर नेमक्‍या किती लस लागतील, हे निश्‍चित होईल. संकट संपलेले नाही. पुढील दोन महिन्यांचे आव्हान आहे. दिवाळीत सावध राहा. दुसरी लाट आली तर खूप त्रास होईल.'' 

ते म्हणाले,""जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्‍यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात सुरू केलेली ऑक्‍सिजन सोय करण्याचा मोठा उपयोग झाला. आरोग्य केंद्रामध्ये कोरोना बाधित होऊन ऑक्‍सिजनची गरज असणारे 1010 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी सुमारे 400 रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातच बरे होऊन घरी परतले. 600 रुग्णांची प्रकृती स्थिर करून पुढील उपचारासाठी पाठवले. 99 टक्के रुग्ण बरे झाले.'' 

डॉ. संजय साळुंखे म्हणाले,""जिल्ह्यात आतापर्यंत 44 हजार 416 लोक कोरोना बाधित झाले. त्यापैकी 40 हजार 768 बरे झाले. 2 लाख 9 हजार 803 लोकांची तपासणी करण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 91.78 टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण 3.17 पर्यंत खाली आले आहे. मनपा क्षेत्रातील नऊ व विटा येथील दोन अशा 11 खासगी रुग्णालयांना नॉनकोविडसाठी परवानगी देण्यात आली आहे.'' 

कोविड पश्‍चात उपचार 
डॉ. संजय साळुंखे म्हणाले,""मिरज कोरोना हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू केले आहे. सांगलीत वसंतदादा रुग्णालयात कोविड पश्‍चात उपचारांसाठी फिजिओथेरोपी सेंटर सुरू केले आहे. रुग्णांना तेथे उपचार घ्यावेत. दुखणी अंगावर काढू नयेत.'' 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine will be given first to medical field; will be available in New year, Online registration begins