कोरोना'शी 'सामना' महत्त्वाचा की राजकारण? 

धर्मवीर पाटील
Tuesday, 31 March 2020

इस्लामपूर,  ः : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर हे केंद्र राज्यभर चर्चेत आलेले असताना शहराची नकारात्मक प्रतिमा बनविण्यात काहींचा पुढाकार आहे तर काहीजण शहरात निर्माण झालेल्या या भयावह परिस्थितीचा वापर राजकारणासाठी करत आहेत. आज जे संकट सर्वांच्यासमोर उभे आहे, या परिस्थितीत आपण त्याला तोंड द्यायचे की राजकारण करायचे? असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित होत आहे. 'प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे सोडून द्या आणि एकत्र येऊन कोरोनाशी लढूया', अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

इस्लामपूर,  ः : शहरात एक नाही, दोन नाही तर तब्बल 25 रुग्ण आढळल्याने शहर चर्चेत आले आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाली याला जबाबदार कुणाला धरायचे? पण जे झाले ते झाले, पुढे हा संसर्ग वाढू नये हे पाहिले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यात जर राजकारण शिरत असेल तर मात्र ते भयानक आहे.

कोरोनाबधित व्यक्ती इस्लामपुरात पोचल्या कशा? विमानतळावरून त्यांना इकडे यायला कुणी मदत केली? ते ज्या गल्लीत राहतात तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांचे 'मोठेपण' (?) आणि ते करत असलेल्या कामांचा दिखाऊपणा या बाबींवर प्रामुख्याने जोर दिला जात आहे, ते गैरलागू आहे. रुग्ण ज्या एका विशिष्ट समाजाचे आहेत, त्या समाजाला 'टार्गेट' करण्याची वृत्ती काही कारणाने पुढे आली, हेही लज्जास्पद आहे.

मग त्यांना काऊंटर म्हणून या समाजानेही काही कृती करायच्या हेही दिसले. फोनवरील दोघांचा संवाद, त्यातील भाषा ही समर्थनीय नाहीच; पण त्याचे ज्या पद्धतीने भांडवल झाले त्याला तोड नाही. कोरोना राहिला बाजुला, शहरात फक्त चर्चा त्याचीच होती. संबंधितांवर गुन्हे दाखल झाले, पोलीस योग्य ती कारवाई करतीलच; पण हा विषय जिथल्यातिथे थांबला तरच ठीक आहे.

शहरात आणि तालुक्‍यात प्रशासन जीव तोडून मेहनत करून परिस्थिती आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न करत असताना अमुक एका गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याची पत्रके दिली जातायत, हेही दुर्दैवी आहे! ज्या कोरोना संशयितांना काळजीचा भाग म्हणून सक्तीने एकत्र केले आहे, तेही प्रशासनाला टार्गेट करतायत, व्यवस्थेविषयी टीका करतायत, याचे आश्‍चर्य वाटते.

इस्लामपूर शहराची बदनामी झाली, आता ईश्वरपूर असे नामकरण झालेच पाहिजे किंवा हे इस्लामपूर आहे, इस्लामाबाद नव्हे असे जे काही मेसेज व्हायरल होतायत ते मूळ विषयाला बगल देऊन सद्यपरिस्थिती तिसरीकडेच नेणारे ठरत आहेत. नुकतीच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इस्लामपुरात आढावा बैठक घेतली, त्या बैठकीला ज्या शहरात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या शहराच्या नगराध्यक्षांना निमंत्रणच दिले नसल्याचे दिसून आले.

या सगळ्यात अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात लोकांचे मेडिटेशन व्हावे या उदात्त हेतूने पोलिसांनी एक उपक्रम सुरू केला, पण तिथेही 'राजकीय भाषणे' व्हायला लागल्यावर पोलिसांना हा उपक्रम गुंडाळावा लागला, यावरून काय तो बोध घ्यावा! 

वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहराला देदीप्यमान परंपरा आहे, राज्यस्तरीय आणि देशपातळीवर अनेक उपक्रमांमध्ये विविध कारणांनी हे शहर अग्रेसर राहिले आहे. अनेकांच्या आयुष्यात जसा या भागाने बदल घडवला तसेच अनेक लोकांनी हा भाग विकसित केला आहे, या सर्वाचे भान आणि जाणीव ठेवून समोर आलेल्या संकटांशी दोन हात करण्याची भावना बाळगायला हवी. शासन आणि प्रशासन यांनी मिळून काहीही केले तरी त्याला नागरिक, जनता,

राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास काही चांगले परिणाम सहजरित्या पाहायला मिळतील, हा इतिहास आहे. सर्वानी हे घडवून आणूयात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Corona's 'encounter' important or politics?