कोरोनाचे नोडल ऑफिसर नगरसेवकाला म्हणाले, ""मला मारणार असाल तर मारा'' 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

महापालिकेचे नगरसेवक अभिजित भोसले आणि कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांच्यात मोबाईलवरून जोरदार बाचाबाची झाली.

सांगली ः महापालिकेचे नगरसेवक अभिजित भोसले आणि कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांच्यात मोबाईलवरून जोरदार बाचाबाची झाली. ती सध्या सोशल मिडियात चर्चेत आहे. स्वतः भोसले यांनी ती क्‍लीप फेसबूकवर अपलोड केली आहे. डॉ. साळुंखे यांच्याशी भोसले यांनी मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केल्यानंतर त्यांनी ""मला मारणार असाल तर मारा'', अशी उद्विग्न भावना व्यक्त केली. कोरोना रुग्णांना आवश्‍यक सुविधा गतीने मिळत नाहीत, असा आरोप भोसले यांनी केला. त्याला उत्तर देताना डॉ. साळुंखे यांनी "शक्‍य तेवढे सर्व प्रयत्न सुरु आहेत', असे उत्तर दिले. 

अभिजित भोसले यांनी एका महिला रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याबाबत विनंती केली होती. त्यांना सकाळी नऊ वाजता रुग्णालयात पाठवण्यात आले, दुपारी त्यांना दाखल करून घेतले आणि रात्री त्यांचा मृत्यू झाला. या मुद्यावर भोसले यांनी डॉ. साळुंखे यांच्याशी बोलताना जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याची तक्रार केली. त्यावेळी भोसले यांचा आवाज सुरवातीला चढल्यानंतर डॉ. साळुंखे यांनी "मला मारणार असाल तर मारा... मी येऊ का तिथे', अशा भाषेत कोरोना संकटातील हतबलता व्यक्त केली. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि उपलब्ध सुविधा यामध्ये ताळमेळ नाही, इतक्‍या दिवसांत तो का घातला गेला नाही, माणसे रस्त्यावर फिरत आहेत, त्यांना बेड मिळत नाहीत, वेग वाढवणार आहात की नाही, असे प्रश्‍न भोसले यांनी विचारले. त्यावर डॉ. साळुंखे यांनी प्रशासनाकडून शक्‍य ते सर्व प्रयत्न ताकदीने सुरु असल्याचे सांगितले. 

सध्या मोबाईलवरील संवाद रेकॉर्ड करून तो सोशल मिडियात फिरवण्याचा ट्रेंड जोरात सुरु आहे. त्यात कोरोना काळातील आपल्या कामगिरीचे मुल्यमापन व्हावे, असेही काहींना वाटते. त्यानिमित्ताने का असेना नेमकी परिस्थिती काय, याची उघड चर्चा आता सुरु झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona's nodal officer told the corporator, "If you want to kill me, kill me."