esakal | कोरोनाची वर्षपूर्ती : अर्थकारणाच्या सर्वच क्षेत्रांची चाके रुतलेलीच 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona's one yea : A year plagued by lockdown; all sectors still recovering

वर्षभरात कोरोनाने ग्रासले नाही असं कोणतंही क्षेत्र नाही. अर्थकारणाचा गाडा आजही पूर्वपदावर आलेला नाही. वर्षभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल याबाबत वेगवेगळ्या क्षेत्रांचा घेतलेला धांडोळा. 

कोरोनाची वर्षपूर्ती : अर्थकारणाच्या सर्वच क्षेत्रांची चाके रुतलेलीच 

sakal_logo
By
संकलन :जयसिंग कुंभार, विष्णू मोहिते, अजित झळके, घनश्‍याम नवाथे, शैलेश पेटकर, अजित कुलकर्णी

आज 23 मार्च. बरोबर वर्षापूर्वी कोरोनाची टाळेबंदी लागू झाली. वर्षानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आणखी काही वर्षे मास्क बांधूनच वावरावे लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरात कोरोनाने ग्रासले नाही असं कोणतंही क्षेत्र नाही. अर्थकारणाचा गाडा आजही पूर्वपदावर आलेला नाही. त्याच्या परिणामातून सावरण्याची ही धडपड आजही सुरूच आहे. वर्षभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल याबाबत वेगवेगळ्या क्षेत्रांचा घेतलेला धांडोळा. 

आरोग्य  : व्यवस्थेच्या मर्यादा उघड
आरोग्याच्या क्षेत्रात सर्वाधिक उलथापालथी झाल्या. खासगी आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा या वर्षभरात ठळकपणे उघड झाल्या. आज वर्षभरानंतरही कोरोनाच्या प्रसाराबाबतचा नेमका अंदाज डॉक्‍टरांना बांधता आलेला नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीभोवतीच प्रतिबंधात्मक उपचाराची दिशा आहे. गर्दी टाळणे आपल्या एकूण लोकसंख्येचा विचार करता शक्‍य नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करताना नेमकी कोणती दिशा हवी, याबाबतची स्पष्टता दिसत नाही. कोरोना उपचाराबाबत खासगी आरोग्य क्षेत्राबाबत झालेल्या तक्रारींचे प्रमाण खूप मोठे आहे. कोरोना उपचाराच्या निमित्ताने झालेल्या खर्चात कुटुंबे हबकून गेली. खासगी दवाखान्यात सरासरी लाख ते दीड लाख रुपये इतका कोरोना रुग्णांवर खर्च झाला. त्या काळातील वैद्यकीय बिलांबाबत तक्रारी आल्या. त्रयस्थ ऑडिटची मागणी झाली. जुजबी कारवाईपलीकडे काहीही झाले नाही. यानिमित्ताने सरकारी आरोग्य यंत्रणेचे महत्त्वही अधोरेखित झाले. ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांचे जाळे अधिक मजबूत करणे, सांगली-सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये अद्ययावत उपचार सुविधांची गरज याकडे प्रथमच लोकांचे आणि शासन यंत्रणेचे लक्ष गेले. वैद्यकीय-औषध बिले यावर सरकारी नियंत्रणाची गरज व्यक्त झाली. या दिशेने वर्षभरात फार काही झाले नाही; मात्र त्याबाबत व्यापक लोकसंख्येला त्याची जाणीव झाली, हीच कोरोनाची उपलब्धी म्हणायची. 

व्यापार : शटर उघडले, मंदी कायम 
नोटबंदी, जीएसटीच्या फेऱ्यात अडकून जेरीस आलेल्या व्यापारावर कोरोनाने मोठा आघात केला. महापालिका क्षेत्रातील 19 हजार तर जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना या संकटाने जेरीस आणले. ऐन लग्नाच्या हंगामात मार्च, एप्रिल, मे हे तीन महत्त्वाचे महिने बाजारपेठ ठप्प राहिली. सोने-चांदी, कापड, भांडी, स्टेशनरीवर शंभर टक्के तर जीवनावश्‍यक वस्तूंवर निम्म्याहून अधिक परिणाम झाला. दुकानाचे भाडे सुरू होते, कामगारांना किमान निम्मा पगार देऊन चूल पेटती ठेवावी लागली. कर्जावरील व्याज मात्र थांबले नाही. मंगल कार्यालय, केशकर्तनालये, इस्त्री दुकानदार, चिरमुरे भट्टीवाले, फूल दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते या साऱ्यांची होरपळ झाली. या संकटातून हळूहळू मोकळा श्‍वास घेत शटर उघडले; पण आज एक वर्षानंतरही दुकानात ग्राहक कधी येतील, ही प्रतीक्षा संपलेली नाही. ग्राहकही कोरोनाने पोळला आहे, त्याचा खरेदीचा हात आखडता आहे. बाजारपेठेत मंदी आहे. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्या निरीक्षणानुसार, केवळ वीस टक्के लोकांना व्यवसाय आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे भांडवल आहे, कर्जे नाहीत, मुबलक साठा आहे, अशांची परिस्थिती ठीकठाक आहे. इतरांच्या डोळ्यांत पाणी आहे. 

हॉटेलिंग : "सहज' झालेले हॉटेलिंग "चैनी'च्या यादी आले 
हॉटेलमध्ये जेवायला जाणे, ही सहज प्रक्रिया झाली होती. सुखवस्तू, नवमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांसाठी आठवड्यातून, महिन्यातून एक वेळ बाहेरचे जेवण हा "शिरस्ता' झाला होता. कंटाळा आलाय, ऑर्डर द्या आणि घरी जेवण मागवा, ही पद्धत रूढ झाली होती. कोरोना संकटाने या साऱ्या व्यवस्थेला मोठा दणका दिला. हॉटेल व्यवसाय हादरून गेला. लोक घरी बंद झाल्यानंतर विझलेली भट्टी अजूनही हवी तशी पेटलेली नाही, असे हॉटेल मालक संघटना अध्यक्ष लहू भडेकर सांगतात. नवीन हॉटेल सुरू होताहेत; मात्र अनेक जुनी, छोटी हॉटेल बंद करावी लागली. आचारी, कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. उत्तर प्रदेश, कोकणातील हे लोक गावी परतले. काही पुन्हा आले, काही आलेच नाहीत. दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला. खाद्यतेलाच्या दरात 40 टक्के, गॅस सिलिंडरमध्ये दोनशे ते अडीचशे रुपये वाढ झाली. भाजीपाला, मटण, चिकन सारेच महागले; पण खाद्यपदार्थांचा दर वाढवण्याचे धाडस होईना. आधीच ग्राहक नाहीत, त्यात दरवाढ झाली तर लोक पाठ फिरवतील का, याची चिंता या क्षेत्राला असल्याचे संघटनेतील सतीश कुंभार यांनी सांगितले. 

अवलंबितांच्या आयुष्याचाच "खेळ' 
कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर जिम व तालीम बंदचे आदेश झाले. जिल्ह्यात जवळपास नऊ महिने 350 हून अधिक जिम बंद राहिल्या. 90 टक्के जिम या भाड्याच्या जागेत आहेत. जिम बंद असतानाही महिनाकाठी 25 ते 30 हजार भाडे भरावे लागले. तसेच मेंटेनन्स, वीज बिलाचा खर्च चालूच राहिला. नऊ महिन्यांनंतर जिम सुरू आहेत. अद्यापही कोरोनाचे सावट आहे. शरीरसौष्ठवच्या स्पर्धाही होत नाहीत. त्यामुळे खेळाडू जिमकडे फिरकत नाहीत. जिम चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अद्यापही ते कोरोनाच्या सावटाखालीच असल्याचे प्रशिक्षक इनायत तेरदाळकर म्हणाले. तालमींची अवस्था तीच आहे. तालमी जवळपास नऊ महिने बंद होत्या. सध्या यात्रा, जत्रा व उरूसांवर बंदी आहे. परिणामी कुस्ती मैदाने भरवली जात नाहीत. त्यामुळे मल्लांपुढे खुराकाचा प्रश्‍न आहे. अनेकांनी तालमींकडे पाठ फिरवली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली तेच मल्ल सध्या सराव करतात. योगासन वर्ग, सांघिक खेळ प्रकार, कराटे यासह वैयक्तिक खेळ प्रकार जवळपास आठ ते नऊ महिने बंदच होते. सर्व प्रकारच्या खेळांचे खेळाडू, प्रशिक्षक आदींना त्याचा फटका बसला. एकमेव बुद्धिबळ स्पर्धा तेवढ्या ऑनलाईन झाल्या. तर क्रीडा साहित्यामध्ये कॅरम बोर्ड व चेससारख्या बैठ्या खेळाचे साहित्य वगळता इतर साहित्यांची विक्रीही मंदावली. 

कृषी : शेती गेली पाच वर्षांनी मागे 
कोरोनाचा सर्वाधिक फटका शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांना बसला. द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, भाजीपाल्याचे कोटवधीचे नुकसान झाले. नाशवंत मालाला बाजारपेठा बंद असल्यामुळे भाजीपाला तर रस्त्यावर फेकून द्यावा लागला. द्राक्ष, डाळिंबांची कवडीमोलानेही विक्री झाली नाही. अनेक भाजीपाला पिकांवर थेट नांगर फिरवायची वेळ आली. गतवर्षीचा कोरोना, अवकाळी, अतिवृष्टीच्या फटक्‍याने शेती व शेतकरी आर्थिक विकासाबाबत पाच-सहा वर्षे मागे पडल्याचे चित्र आहे. झालेल्या नुकसानीचा आकडाही सांगणे कठीण आहे. 
कोरोना आणि लॉकडाऊन सुरू असताना शहरी भागातील लोक घरात बसून होते. त्याचवेळी शेतकरी शेतीच्या कामात व्यग्र होता. कोरोना काळात शेतीमालाच्या दरातील मंदी आजही कायम आहे. व्यवहार सुरळीत झाल्यानंतरही शेती मात्र सुरळीत झालेली नाही. शेतीमाल पिकतोय; मात्र बाजाराची तऱ्हा काही सुधारत नाही. भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब निर्यातीसाठीचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. युरोपीय देशांत लॉकडाउनमुळे स्थानिक बाजारातही दरात मंदी कायम आहे. कृषी पंपाच्या वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीज वितरणने थेट कनेक्‍शन तोडण्यास सुरुवात केल्याने शेतकरी आणखी त्रासला आहे. कोरोनाच्या दीड महिन्याच्या काळात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्याची 30 हजार टन निर्यात झाली होती. खरे तर याच्या दहा पटीने माल तयार झाला होता; मात्र त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आली. ती आजही कायम आहे. 

परिवहन  :  बुडत्या "एसटी'ला 35 कोटींचा खड्डा
जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर एसटीची सेवा सुरवातीला बंद राहिली. नंतर धोका पत्करून एसटीच्या चालकांनी जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी, नोकरदार आदींना हजारो किलोमीटर दूरवर जाऊन सुखरूप पोहोच केले. एसटीची सेवा सुरू करण्यास ऑगस्टमध्ये परवानगी मिळाली; परंतु काही दिवस निम्म्या क्षमतेने, त्यानंतर सध्या पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी धावते आहे; परंतु अद्यापही पूर्ण फेऱ्या सुरू नाहीत. एसटीने उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा तसेच मुंबईत बेस्टच्या मदतीसाठी गाड्या व कर्मचारी पुरवले. एसटीचे 2019-2020 चे उत्पन्न 47 कोटी 55 लाख रुपये होते; परंतु यंदाच्या वर्षात हे उत्पन्न जवळपास 35 कोटींनी घटले आहे. 2020-21 मधील उत्पन्न 13 कोटी 43 लाख रुपये मिळाले आहे. एसटी अगोदरच तोट्यात धावते. त्यामध्ये कोरोनाच्या संकटाची भर पडली असून तोटा वाढतच आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन, एसटीपासून दुरावत चाललेला प्रवासी यामुळे कर्मचाऱ्यांना एसटीच्या अस्तित्वाची चिंता वाटत आहे. दिवसेंदिवस भीतीची ही छाया अधिकच गडद होते आहे. 

औद्योगिक : उद्योगांची चाके रुतलेलीच 
अन्य राज्यांच्या तुलनेतील वाढीव वीज दर, जीएसटी, नोटबंदी यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी मंदीची लाट होती. या परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू असताना लॉकडाउन झाला. यामुळे अनंत अडचणी उद्योगांसमोर आल्या. बॅंकांचे हप्ते, कामगारांचे पगार यासह साऱ्याचा ताळमेळ घालण्यात तारेवरची कसरत करावी लागली. त्यानंतर अनलॉक काळात उद्योग सुरू झाल्यानंतर परजिल्ह्यातील कामगार आले नसल्याने कामगारांची कमतरता आहे. बंद काळातील वीज बिलही भरावे लागले. तयार केलेला माल विक्री होत नसल्याने फिरते भांडवल थांबले. परिणामी अनेक उद्योग बंद पडले. राज्यातील सुमारे 1500 उद्योग बंद झाले. सांगली जिल्ह्यात छोटे-मोठे मिळून 788 उद्योग आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्योगांची चाके आणखी रुतत चालली आहेत. पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण झाल्याने औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस भीतीची ही छाया अधिकच गडद होत आहे. 

कामगार : कामगारांची अस्वस्थता कायम 
कोरोना विषाणू संसर्गाच्या भयापोटी टाळेबंदी लागू झाली अन्‌ एक काळाकुट्ट कालखंड सुरू झाला. औद्योगिक वसाहतीतील यंत्रांची 24 तास सुरू असणारी धडधड थांबल्याने हातावर पोट असणाऱ्यांना जगण्याची भ्रांत सतावत राहिली. बाहेर पडण्यावरही मनाई असल्याने खाण्यापिण्याचे वांदे झाले. उपासमारीचे दुष्टचक्र सुरू झाले. कोरोनाने हाहाकार माजवल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परप्रांतातील हजारो कामगारांसमोर पुढे काय, असा प्रश्‍न उभा राहिला. वाहतूक, दळणवळण ठप्प असल्याने गावाकडेही जाता येईना. काही कारखानदार, उद्योजक, सामाजिक संस्थांनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली; मात्र कुटुंबीयांची काळजी व ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने पायपीट सुरू झाली. डोक्‍यावर कडक ऊन झेलत, खाण्यापिण्याची आबाळ होत असतानाही शेकडो किलोमीटरचा प्रवास करत काहींनी घर गाठले; मात्र तेथे जाऊनही पुन्हा उपासमारीचे संकट ओढवल्याने हतबलता वाढली. स्थानिक कामगारांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती. शेतमजुरांना राना-शिवारात आधार भेटत होता; मात्र कष्टकरी, श्रमिकांचा आवाज क्षीण बनल्याचे चित्र होते. सहा महिन्यांहून अधिक काळ ही परिस्थिती कायम होती; मात्र सामाजिक संस्था, संघटनांच्या मदतीमुळे बहुतांश जणांना दिलासा मिळत गेला. मनोरंजन : पडदा...रंगमंचावर अजूनही अंधारच 
भूकंप, महापूर, वादळ अशी कोणतीही आपत्ती असो; कला क्षेत्रातील संवेदनशील मने मदतीचा हात घेऊन पुढे सरसावत; मात्र कोरोनाच्या टाळेबंदीत मनोरंजन क्षेत्र भरडून निघाले. गावोगावचे कलाकार बेसहारा बनले. ग्लॅमरच्या झगमगाटात वावरणारे तारे जमिनीवर आले. चित्रपटाला प्रेक्षक मिळेनात, नाटक, तमाशाला रसिक भेटेनात. थिएटरवरची गर्दी केव्हाच विरली. इतर कलाक्षेत्राची अवस्था तर गलितगात्र बनली. बॅकस्टेज कलाकारांना हे क्षेत्र अशाश्‍वत बनल्याने ते इतर व्यवसायात गेल्याचे मुकुंद पटवर्धन यांनी सांगितले. गावोगावच्या जत्रा, उरुस, यात्रांवर बंधने आली. त्यामुळे मनोरंजन नावाचा प्रकारच लोकांच्या आयुष्यातून पुसट होत गेला. ऐपतीनुसार आम्ही धान्य, जीवनावश्‍यक वस्तू कलाकारांच्या घरी जाऊन स्वत: वितरित करून आधार दिला. कितीही संकटे आली तरी रोजीरोटीचा प्रश्‍न कधीही गंभीर बनत नव्हता; मात्र टाळेबंदीमुळे गावगाड्यातील कलाकारांच्या आयुष्याचा तमाशा बनण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे शाहिरीसम्राट देवानंद माळी यांनी सांगितले.

शिक्षण  : ज्ञानव्यवस्थेत नवयुगाचा आरंभ 

जिल्ह्यात 15 मार्च 2020 रोजी शाळा बंदचा पहिला आदेश आला. शहरी आणि ग्रामीण सर्व शिक्षण व्यवस्था ठप्प झाली. परीक्षा झाल्या नाहीत, मुलांना पुढे चाल देण्यात आली. चालू शैक्षणिक वर्ष सुरू करताना अनेक प्रश्‍न होते. त्या प्रश्‍नांची उकल करताना शिक्षण व्यवस्थेला कलाटणी देणारी ऑनलाईन शिक्षण पद्धती उदयाला आली. कोरोना संकटाने सर्वात मोठा बदल घडवला तो शिक्षण व्यवस्थेत. गेल्या एक वर्षात ही यंत्रणा 360 अंशाच्या कोनात बदलून गेली. जग तळहातावर आले आहे, हे केवळ पुस्तकी ज्ञान राहिले नाही तर तळहात हाच फळा झाला आणि त्यावर जगाचे ज्ञान उमटू लागले. ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेने नव्या युगाचा प्रारंभ झाला. हे किती चांगले, किती वाईट, मुलांच्या आकलन क्षमतेबाबत काय परिणाम होतील, याबाबतचे निष्कर्ष यायला वेळ लागणार आहे. परंतु, एक नवी व्यवस्था तयार झाली. शिक्षकांना स्वतःमध्ये मोठे बदल करून घ्यावे लागले. शिक्षकांनी आधुनिकतेचा रस्ता तुडवला आणि ता आगामी काळाचा राजमार्ग ठरू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील की नाही, त्या झाल्या तर कशा होतील, याबाबत आजही अनिश्‍चितता आहे. स्पर्धा परीक्षांबाबत गोंधळ झालाच. अनेकदा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आणि त्या कालच पार पडल्या. उच्च आणि तांत्रिक शिक्षण व्यवस्थेत मात्र अनेक आव्हाने निर्माण झाली. विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. कठीण विषय समजून घेताना त्यांची खूपच अडचण झाली. आठ-आठ तास मोबाईलसमोर बसून राहिल्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या. शैक्षणिक शुल्क आकारणीबाबत तर आंदोलने झाली. प्रश्‍न अजून संपलेले नाहीत. कालागणित त्याची उत्तरे शोधावी लागतील, मात्र शिक्षण व्यवस्था पुरती बदलून गेली आणि तो बदल आतापर्यंत तरी नव्या पिढीने स्वीकारला आहे, असेच म्हणावे लागेल. 

कोरोना वर्षभरात... 

 • एकूण बाधित : 49 हजार 856
 • मृतांची संख्या : 1 हजार 775 
 • कोरोनामुक्त : 47 हजार 078 
 • शहरी रुग्ण : 7 हजार 430 
 • ग्रामीण रुग्ण :25 हजार 257 
 • मनपा क्षेत्रातील रुग्ण  : 17 हजार 169 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

 • जत ः 2462 
 • कडेगाव ः 3033 
 • कवठेमहांकाळ ः 2530 
 • खानापूर ः 3143 
 • मिरज 4664 
 • पलूस ः 2658 
 • शिराळा ः 2335 
 • तासगाव ः 3514 
 • वाळवा ः 5704 
 • आटपाडी : 2644

संपादन : युवराज यादव 

loading image