ना मिरवणूक...ना मंडप, कोरोनाच्या नियमांचे सर्वतोपरी पालन

शैलेश पेटकर
Sunday, 23 August 2020

कोरोना संकट काळात यंदाचे सर्वच उत्सव एक तर रद्द झालेत किंवा साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. गणेशोत्सव घरातच करण्याच्या पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मंडळानी होकार दिला.

सांगली -  शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा आज विराजमान झाले. यंदाच्या उत्सवात कोणताही डामडौल, मंडप, वाजंत्री, मिरवणूक दिसून आलेली नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या घरीच मूर्ती प्रतिष्ठापना करून कोरोना नियमांचे सारे पालन करण्यात आल्याचे दिसून आले. 

कोरोना संकट काळात यंदाचे सर्वच उत्सव एक तर रद्द झालेत किंवा साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. गणेशोत्सव घरातच करण्याच्या पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व मंडळानी होकार दिला. त्यानुसार आज अपवाद वगळता रस्त्यावर कोठेही मंडप घालण्यात आलेला नाही. मंडळांनी अध्यक्ष किंवा सदस्याचा घरी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे दिसून आले. आज सकाळपासून मंडळांच्या गणेश मूर्ती नेण्यासाठी लगबग दिसून आली. अगदी मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा बाप्पांचे स्वागत करण्यात आले. 

ज्याठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याठिकाणी आरास, सजावट करण्यात आली होती. शहरातील मोठ्या मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठाना केली असून कोणताही मिरवणूक काढण्यात आलेली नाही. काही मंडळांनी शाडूची मूर्ती प्रतिष्ठापना करून सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. काही मंडळांनी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact ganesh festival sangli city