esakal | दुर्दैवी! हजार टन भाजीपाला शिवारातच

बोलून बातमी शोधा

coronavirus impact vegetables sangli district

तोच महामारी कोरोना आल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला शेतीमाल भाजीपाला शिवारात पडून राहिला आहे.

दुर्दैवी! हजार टन भाजीपाला शिवारातच
sakal_logo
By
बाळासाहेब गणे

तुंग (सांगली) -  कोरोनामुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाले आहेत. शेतकरीही यातून सुटलेला नाही. सगळ्यात जास्त फटका हा बळीराजाला बसला आहे. "माल आहे पण उठाव नाही' अशी अवस्था सध्याच्या घडीला दिसत आहे. सांगली जिल्ह्यात ऑगस्ट 2019 मध्ये आलेला महापूर त्यानंतर झालेली अतिवृष्टी त्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीस आला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच महामारी कोरोना आल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला शेतीमाल भाजीपाला शिवारात पडून राहिला आहे. तर उत्पादन खर्च निघत नसल्याने भाजीपाला शेतातच काढून टाकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, शिराळा या तालुक्‍यातील दररोज 15 हजार टन भाजीपाला जिल्ह्यातील मार्केटसह मुंबई, पुणे, बेळगाव, इंदापूर, या बाहेरील मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला जात आसे. आता तो अवघ्या 500 टनावर आला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये भाजीपाला आहे. माल विक्री होण्याची शक्‍यता नसल्याने व्यापारी माल उचलण्याचे धाडस करताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

कोट्यावधीची उलाढाल टप्प झाली आहे. कृष्णा, वरणा नदीकाठावरील मिरज पश्‍चिम हे भाजीपाल्याचे आगार म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यासह या भागातील भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कोबी, फ्लॉवर, ढबू, घेवडा, टोमॅटो, भेंडी, गवारी, वांगी, मेथी, कोथिंबीर, दोडका, कारले,भोपळाहा भाजीपाला मुंबई, पुणे, इंदापूर, हैदराबाद, बेळगाव ही मोठी बाजारपेठा असणाऱ्या ठिकाणी पोचू न शकल्याने रानातच पडून राहिला आहे. पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक मार्केट तसेच गावागावांत फिरून विकला आहे. तर उर्वरित काढून टाकला आहे. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने दुधी भोपळा पिक न खपल्याने भोपळा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी उभ्या पिकात रोटर मारले आहेत. तुंगच्या विकस घुणके या युवकाने 40,000 खर्च करून पिकवलेला एक एकर फ्लावर शेळ्यांना चारला तर तुंग, समडोळी नांद्रे कवठेपिरान या भागातील ढबू उत्पादकानी तर मिरची शेतात विस्कटून टाकली आहे. काहीनी हिरवळीचे खत म्हणून सरी मध्ये टाकले आहे. 

विक्री व वितरण व्यवस्था साखळी कोलमडल्यामुळे भाजीपाल्याचा खच बाजारपेठेऐवजी बांधावर पडलेला दिसत आहे. स्वयंपाक रुचकर करणाऱ्या कोथिंबिरीला तर उठाव नसल्याने फुले आल्यामुळे रानातच नांगरून टाकले आहे. मालाचा उठाव नसल्याने व मजूर, औषध फवारणी खर्च वाढत आसल्याने उभे पिके काढून टाकण्याची मानसिकता दिसत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कोरानाची धास्ती दाखवून कवडी मोलाने घेतलेला माल बाहेर ज्यादा दराने विकण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून आले आहे. ढबूची मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई ,पुणे येथे खरेदीला गर्दी नसल्यामुळे व हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे भाजीपाल्याचा उठाव होत नसल्याने सुरुवातीला घातलेला खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे. महापूर,आतिवृष्टी आणि कोरोना या लागोपाटच्या संकटामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

तालुक्‍यातून जाणारा दररोज माल (टनात) 

तालुके - कोरोनापूर्वी - सध्या 

मिरज - 500 100/150 

वाळवा- 400 150/200 

शिराळा- 5 2 

तासगाव- 50 10/15 

पलूस- 20 8/10 

कडेगाव- 300 150 

कोरोनामुळे शेतीमालाचा उठाव होत नाही. दोन एकरातील कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले. तीन रुपये किलो दराने कलिंगड द्यावी लागत आहे. तसेच अवस्था ढबू मिरचीची आहे. सात टन मिरची एक रुपये किलोप्रमाणे तोडून खतासाठी देऊन टाकली. 

- अक्षय कराडे, ढबू व कलिंगड उत्पादक शेतकरी, तुंग 

पुणे मार्केटमध्ये एक दिवस भाजीपाला, एक दिवस कांदे-बटाटे, एक दिवस, अशी वितरण व्यवस्था होती. गर्दी वाढू लागल्याने सगळेच एक दिवस आड चालू केले. परंतु शासनाच्या आदेशामुळे मार्केट कमिटीने शुक्रवारपासून व्यापारांना मार्केट मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- बाबासाहेब सूर्यवंशी, भाजीपाला अडत व्यापारी, पुणे मार्केट 

मुंबई भाजीपाला मार्केट सध्या बंद आहे. शेतकऱ्यांना मला पाठवू नका असे आम्ही कळवले आहे. मार्केट चालू झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना संपर्क करण्यात येईल. 

- जालिंदर खेडेकर, भाजीपाला व्यापारी, मुंबई 

एकरातील टोमॅटो पिकाला चार रुपये किलोने दर मिळाला. तर सांगलीच्या स्थानिक बाजारपेठेत पाठवलेली वांग्याची दोन वेळेची पट्टीही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे वांग्याचे पीक कापून टाकले आहे. तर टोमॅटोवर रोटर फिरवणार आहे. 

- ज्ञानेश्वर पाटील, टोमॅटो व वांगी उत्पादक शेतकरी, कवठेपिरान 

जिल्ह्याबाहेरील मोठे मार्केट बंद असल्याने सध्या स्थानिक व शेजारील जिल्ह्यात भाजीपाला पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य व लागेल ती मदत करत आहोत.

- प्रदीप कदम, मिरज तालुका कृषी अधिकारी