"कोरोना' ः गावकुस, वाडे फुलले... शहरं पडली सुनी

दत्ता इंगळे
शुक्रवार, 20 मार्च 2020

पुन्हा एकदा आजी-आजोबांच्या गोष्टी, गेल्या शतकातील प्लेगची साथ, आकाशवाणी, दृक्‌श्राव्य माध्यमे, वर्तमानपत्रांचे वाचन, यांसह डिजिटल मीडियावरील बातम्या ऐकण्यावर सामूहिक भर देण्यात येतोय. नोकरीधंद्याच्या निमित्ताने विभक्त झालेली कुटुंबे "कोरोना'च्या धास्तीने पुन्हा एकत्रित दिसू लागल्याने घराघरांत गोकुळ अवतरले आहे.

नगर तालुका ः "कोरोना'च्या भीतीने पोटापाण्यासाठी शहरात गेलेली कुटुंबे, उच्चशिक्षणासाठी परराज्यांत, परदेशांत गेलेले विद्यार्थी, विविध कारखाने, कंपन्यांत नोकरी करणारे चाकरमाने गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे गावोगावचे वाडे पुन्हा एकदा फुलून गेले आहेत. 

जगभरात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे भल्याभल्यांची पाचावर धारण बसली असून, गड्या, आपला गावच बरा.. असे म्हणत अनेक जण गावाकडे परतू लागले आहेत. गावातील घर, जुना वाडा पूर्वी समृद्धीने नटला होता. मात्र, भाकरीच्या शोधात शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खेडी ओस पडू लागली. वाड्यांची दुरवस्था झाली.

आता शहरातील गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्यात होत आहे. अशा वेळी मोठ्या शहरांत गेलेले चाकरमाने गावाकडे परतू लागले आहेत. कधी काळी भल्या मोठ्या वाड्यात आजी-आजोबा आणि शेतात राबणारा काका, असे वातावरण होते. गेल्या महिनाभरापासून "कोरोना'च्या धास्तीने गावाकडे येणाऱ्यांची संख्या कमालीची वाढल्याचे चित्र आहे. 

वाड्यातील न्हाणीघराजवळ मोठ्या पितळी पिंपात पाणी भरून ठेवलेले, शेजारी सॅनिटायझरची बाटली, असे चित्र दिसत आहे. बाहेरून कोणी आले, की घरातील लहानथोर हात स्वच्छ धुण्यासाठी पळत आहेत. सॅनिटायझरचे महत्त्व घरातील लोकांना समजावून सांगण्यात येत आहे. मोठ्या शहरांत दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. दुसरीकडे, गावागावांतील पारावर "कोरोना'च्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जात आहेत. 

पुन्हा एकदा आजी-आजोबांच्या गोष्टी, गेल्या शतकातील प्लेगची साथ, आकाशवाणी, दृक्‌श्राव्य माध्यमे, वर्तमानपत्रांचे वाचन, यांसह डिजिटल मीडियावरील बातम्या ऐकण्यावर सामूहिक भर देण्यात येतोय. नोकरीधंद्याच्या निमित्ताने विभक्त झालेली कुटुंबे "कोरोना'च्या धास्तीने पुन्हा एकत्रित दिसू लागल्याने घराघरांत गोकुळ अवतरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus People from the town leave for the village