मुख्याधिकाऱ्यांना खुर्ची मारण्याचा नगरसेवकाचा प्रयत्न

 Corporator's attempt to hit the chief officer of Islampur
Corporator's attempt to hit the chief officer of Islampur

इस्लामपूर (जि. सांगली) : येथील कोरोनाबाधित कंटेन्मेंट एरियामध्ये नगरपालिकेच्याच कचरा गाडीतून दारूची चोरटी वाहतुकीची घटना आज येथे उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित वाहन व चालकावर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी दिले होते. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव व त्यांच्यात वाद झाला. या वादात जाधव यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांत दाखल केली आहे. यावरून मोठी खळबळ उडाली आहे. 

इस्लामपूर गेले महिनाभर कोरोनाच्या बाधित रुग्णांमुळे हॉट स्पॉट बनले आहे. त्यातच कंटेन्मेंट परिसरात नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीतून दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. मुख्याधिकारी पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नगरसेवक जाधव हे आपल्या केबीनमध्ये आले आणि त्यांनी ही वाहने का अडवली? असा जाब विचारला.

यावर नियमाप्रमाणे कारवाई होणारच म्हटल्यावर जाधव यांनी आपल्या अंगावर खुर्ची घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर जाधव यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आपल्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग यांच्यासह दहा जणांना या घटनेबाबतचे पत्र दिले आहे. महिला मुख्याधिकाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. 

मंगळवारी (ता. 28) दुपारी शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीमधून दारू वाहतूक होत असल्याबाबत त्या प्रभागाचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी मुख्याधिकारी पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. पवार यांनी याची तत्काळ दखल घेऊन संबंधित वाहनावरील ठेकेदारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्याचे आदेश मुकादमाला दिले होते. या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास प्रभारी आरोग्य अधिकारी साहेबराव जाधव यांच्या मोबाईलवर नगरसेवक खंडेराव जाधव यांनी फोन केला. ते वाहन का धरून ठेवले आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी साहेबराव जाधव यांनी त्या वाहनाबाबत नक्की काय प्रकार घडलाय ते माहीत नसल्याचे त्यांना सांगितले.

त्यानंतर जाधव यांनी दुपारी अडीचच्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांना फोन करून आपण नक्की कशासाठी कार्यवाही करत आहात, असा प्रश्‍न विचारला. यावेळी पालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. या प्रकरणात मी कोणत्याही नगरसेवकांचे नाव किंवा चोरटी दारू वाहतूक होत आहे याचा उल्लेख केलेला नाही. कायद्यानुसार कारवाई होईल असे सांगितले. दरम्यान, जाधव लगेचच थेट पालिकेत मुख्याधिकारी दालनात आले आणि पुन्हा जाब विचारू लागले. यावेळी मुख्याधिकारी यांनी "तुम्ही काय करणार आहात' असे विचारल्यावर चिडून त्यांनी "ये बाई, तुला मस्ती आली आहे' असे म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

केबिनमधील खुर्ची उचलून ते मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभियंता जमिर मुश्रीफ व साहेबराव जाधव यांनी त्यांना अडवले. तरीही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत ते अंगावर धावून जात होते. त्यानंतर "तुझे घराबाहेर निघणे मुश्‍कील करतो, तुला बघून घेतो, तुझ्या कुटुंबाला बघून घेतो' अशी धमकी दिली. मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता. 

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस सुट्टी न घेता 24 तास काम करत आहेत. दिवसभर कोरोनाबाधित एरियात फिरत असल्याने आम्ही घरातही कुटुंबापासून लांब राहून शहराच्या हितासाठी काम करत आहोत. आम्ही सर्वजण नोकरीपेक्षा सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबत असताना खंडेराव जाधव यांच्या कृत्याने माझ्यासह सर्व कर्मचारी भयभीत झाले आहेत. या नगरसेवकाने सर्वांच्या समक्ष मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबाला बघून घेतो अशी धमकी दिलेली आहे.

या सर्व प्रकारामुळे मी भयभीत झालेली असून नगरसेवक जाधव यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. सदरच्या घंटागाडीतून दारू वाहतूक होत असलेल्या तक्रारीमुळे जाधव एवढे का चिडले? आणि त्यातून घडलेला हा सर्व प्रकार अनाकलनीय आहे. या प्रकरणाशी संबंधित नगरसेवक यांचा संबंध असल्याचा मला संशय आहे. या प्रकाराबाबत जाधव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य ढासळणार नाही, या आशयाचे पत्र त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा, मानवी हक्क आयोग, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. मुख्याधिकारी प्रज्ञा पवार फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात थांबून होत्या. 

नगरसेवकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न! 
कंटेन्मेंट एरियासाठी पालिकेने नेमून दिलेली कचरा गाडी (एमएच 10 सी.आर. 2654) आहे. ती नेहमी सकाळी येऊन जाते. आज दुसऱ्याच नंबरची (एमएच 10 सीआर 2648) गाडी आणि तीही दुपारच्या वेळेत आल्याने नगरसेवक अमित ओसवाल यांनी चौकशीचा प्रयत्न केला. या गाडीतून दारू वाहतूक होत होती. त्यामुळे चालकाने गाडी सुसाट वेगाने पळवत नेत नगरसेवक अमित ओसवाल यांच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचे ओसवाल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिसांना आढळल्या रिकाम्या बाटल्या! 
याबाबत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, "दारू वाहतूक होत असल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी संबंधित निनाईनगर येथील चालकाची भेट घेतली. त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीत काहीही नव्हते. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन कचरा डेपोवर गेले. त्याठिकाणी पोलिसांना दोन बॉक्‍स आढळले; पण ते रिकामे होते. शिवाय त्या ठिकाणी बीअरच्या मोकळ्या बाटल्या दिसल्या. नगरपालिकेने नेमलेला प्राधिकृत अधिकारी अद्याप पोलिस ठाण्यात आलेला नाही, तो आला आणि तक्रार दिली तर घेऊ. वाहन ताब्यात घेतलेले नाही. 

जाधव यांचे वर्तन घृणास्पद

माझ्या हयातीत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. जाधव यांनी एका महिला अधिकाऱ्याबरोबर केलेले वर्तन घृणास्पद आहे. याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करणार आहे. 
- प्रज्ञा पवार, मुख्याधिकारी 

अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही

वाहन अडविल्याची तक्रार आल्यानंतर संबंधित माझ्या प्रभागातील असल्याने मी फक्त चौकशीसाठी पालिकेत गेलो होतो. चर्चेत शाब्दिक चकमक झाली; पण मी त्यांना कसलीही धमकी दिली नाही. गेल्या 20 वर्षांत मी कधीही कोणत्याही अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही. या महिला अधिकाऱ्यांना कशी शिवीगाळ करेन? तसे काहीही कारण नव्हते. 
- खंडेराव जाधव, नगरसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com