
सांगलीत महापौरपद मिळवण्यासाठी तेथील मंत्र्यांनी सत्ता आणि पैशाच्या जोरावर नगरसेवक फोडले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
सांगली ः सांगलीत महापौरपद मिळवण्यासाठी तेथील मंत्र्यांनी सत्ता आणि पैशाच्या जोरावर नगरसेवक फोडले. त्यांनी आता जे केलं तर करू देत. पुढच्या निवडणुकीत आम्ही त्यांना दाखवून देऊ, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. मुंबईत पत्रकार परिषदेत सांगलीच्या विषयावर त्यांनी जोरकस प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,""सांगली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तो भाजपने फोडला. जिल्हा परिषद जिंकली, महापालिका ताब्यात घेतली. तिथला खासदार भाजपचा, सांगलीचा स्थानिक आमदार भाजपचा झाला. त्यामुळे तेथील नेते फस्ट्रेशनमध्ये गेले होते. त्यामुळेच पैशाच्या जोरावर तिथल्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम केला. लोकं फोडून महापौर होण्याचा प्रयत्न केला. त्याने काही फार फरक पडत नाही. सत्ता आणि पैशाची ताकद दाखवून महापालिका फोडली असली, तरी पुन्हा येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ.''
भाजपचे चार-पाच नगरसेवक फुटतील, असा इशारा मिळालेला असताना त्याकडे तुमच्या नेत्यांनी दुर्लक्ष कसे केले? या प्रश्नावर श्री. फडणवीस म्हणाले,""ते कुणी सांगितलं मला माहीत नाही, मी सांगतोय ते लक्षात ठेवायचं.''
खासदार संजय पाटील यांच्या संदर्भाने पत्रकारांनी "काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, त्यांच्यासोबत ऊठ-बस वाढली आहे, भाजपमध्ये नाराजी आहे का?', असे विचारल्यावर श्री. फडणवीस म्हणाले, ""हे साफ चुकीचे आहे. कुणी कुठेही जाणार नाहीत. देशात काय स्थिती आहे, सर्वांना माहिती आहे. या तिघांचे सरकार किती दिवस चालणार, हेही माहिती आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार दहा-पंधरा वर्षे हलणार नाही. त्यामुळे कुणी कुठे जाणार, याबाबत चर्चाच करण्याचे कारण नाही.''
संपादन : युवराज यादव