मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करा...यांनी केली मागणी; आरक्षणात भाजपनेच खोडा घातल्याचा आरोप

विष्णू मोहिते
Sunday, 20 September 2020

सांगली-  मराठा समाजाला न्याय देण्यासाठी 123 वी घटना दुरुस्ती करावी, अशी मागणी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठ्यांना आरक्षणात भाजपनेच खोडा घातल्याचा आरोप त्यांनी केला. 

सांगली-  मराठा समाजाला न्याय देण्यासाठी 123 वी घटना दुरुस्ती करावी, अशी मागणी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठ्यांना आरक्षणात भाजपनेच खोडा घातल्याचा आरोप त्यांनी केला. 

ते म्हणाले, ""सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करून आरक्षण मंजूर करून घेतले मात्र उद्धव ठाकरे सरकारला ते टिकवता आले नसल्याचे वक्तव्य भाजपकडून करून समाजात गोंधळ निर्माण केला जातोय. आरक्षणाला कोर्टामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपची खेळी आहे. सामाजिक, शैक्षणिक मागास समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षणासाठी विधानसभा, विधानपरिषद, मागास आयोगाची मान्यता व राज्यपालाच्या सही घेऊन आरक्षण देता येते. आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकवण्यासाठी लोकसभा, राज्यसभेत मंजुरीने राष्ट्रपतींची सहीने परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करायला हवे होते.' 

ते म्हणाले, ""2018 साली सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटी ऍक्‍टमध्ये गैरवापर रोखण्यासाठी काही बदल केले. त्यावेळी दलित समाज रस्त्यावर उतरला, मोर्चे आंदोलने केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा करून कोर्टाचा निर्णय रद्द ठरवला. आता 123 वी घटना दुरुस्ती करुन मराठ्यांना आरक्षण द्या. सध्या सुरू असलेल्या अधिवेशमध्ये कायदा करा, अन्यथा संतप्त मराठा रस्त्यावर उतरुन धडा शिकवतील. कटकारस्थान करणाऱ्यांनीच दुरुस्ती करावी, अन्यथा 5.80 कोटी मराठा तुमच्या सत्तेला सुरुंग लावतील.' सुभाष गायकवाड, सुधीर चव्हाण, पी. आर. पाटील, चंद्रकांत डांगे, अमोल जाधव, वसंतराव पाटील, रितेश शिंदे, गोपाळ पाटील, अधिक पाटील, पंडित पाटील, विजय संकपाळ, श्रद्धा शिंदे उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Correct the incident for Maratha reservation. demanded by ; BJP is accused of undermining the reservation