esakal | देशात तीन महिन्यांत सव्वा लाख टन बेदाणा फस्त; सांगलीतून देशभरात पुरवठा, कोरोनाचा असाही बूस्टर
sakal

बोलून बातमी शोधा

The country ate 1.5 million tonnes of raisins in three months; Supply from Sangli across the country, such a booster of Corona

कोरोनाने देशभरात सकस अन्नाबाबतचा आग्रह वाढल्याचा परिणाम म्हणून टाळेबंदी उठताच गेल्या तीन महिन्यांत देशात तब्बल सव्वा लाख टन बेदाणा फस्त झाला आहे.

देशात तीन महिन्यांत सव्वा लाख टन बेदाणा फस्त; सांगलीतून देशभरात पुरवठा, कोरोनाचा असाही बूस्टर

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : कोरोनाच्या आपत्तीने बेदाणा उत्पादकांना कोंडीत पकडले होते; मात्र याच कोरोनाने देशभरात सकस अन्नाबाबतचा आग्रह वाढल्याचा परिणाम म्हणून टाळेबंदी उठताच गेल्या तीन महिन्यांत देशात तब्बल सव्वा लाख टन बेदाणा फस्त झाला आहे. तीन महिन्यांतील ही विक्रमी विक्री असून, येत्या सणासुदीच्या काळात उर्वरित शिल्लक सुमारे सत्तर हजार टन बेदाण्याची चांगल्या दराने विक्री होईल, असा अंदाज आहे. 

मार्चमध्ये ऐन द्राक्ष हंगामात टाळेबंदी लागली आणि द्राक्षविक्रीही अवघड झाली. त्यामुळे नेहमीचा बेदाणा आणि द्राक्षेही बेदाणा रॅकवर टाकल्याने दरवर्षीच्या दीड लाख टन बेदाण्यात वाढ होऊन, सुमारे दोन लाख टन इतके उत्पादन राज्यात झाले. टाळेबंदी लांबल्याने राज्यभरातील हा सारा उत्पादित बेदाणा कोल्ड स्टोअरेजला अडकून पडला. टाळेबंदीत सुमारे चार महिने बाजारपेठच ठप्प झाली. लग्नसराईचे दिवस सरले तरी मालाचा उठाव होत नव्हता. दरही सरासरी प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपयांनी घटले. कोरोनाच्या या फटक्‍याने शेतकरी-व्यापारी चिंतातूर होते; मात्र टाळेबंदी उठली आणि देशभरातून बेदाण्याची मागणी वाढली. 

गेल्या तीन महिन्यांत कोरोनाचा आलेख वाढत असताना, पौष्टिक अन्नपदार्थाची गरज सातत्याने चर्चेत आली. विशेषतः प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सुका मेव्याच्या सेवनाची सूचना डॉक्‍टरांकडून सुरू झाल्याने कधी नव्हे तो शहरी भागातून सुका मेव्यात बेदाण्याचा स्वीकार झाला. सुका मेव्याच्या तुलनेत बेदाण्याचे दर कमी असल्याने मागणी वाढली. दरही वाढले. उत्तम प्रतीच्या बेदाण्याचा प्रति किलो दर 170 ते 225 रुपये, मध्यम प्रतीचा 150 ते 170 रुपये, तर तिसऱ्या दर्जाच्या बेदाण्यासाठी 40 ते 100 रुपये दर मिळाला आहे. येणारे दिवस सणासुदीचे असल्याने या दरात आणखी वाढ होणार आहे. आजघडीला देशात सुमारे सत्तर हजार टन बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे. हा खप येत्या दिवाळी-नाताळपर्यंत नक्की होईल. त्याचवेळी नवा हंगामही लांबणार असल्याने बेदाण्याचा पुढील वर्षीही चांगला उठाव होईल, असा अंदाज आहे. 

ड्रायपोर्टला गतीने चालना दिली पाहिजे
राज्यातून जाणाऱ्या दोन लाख टन बेदाण्यातील सुमारे सव्वा लाख टन बेदाणा सांगलीच्या बाजारपेठेतून देशभरात जातो. गेल्या पाच वर्षांत द्राक्ष क्षेत्रात दरवर्षी पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. या मालाला चांगला उठाव होण्यासाठी सांगलीच्या बाजारपेठेची देशाशी कनेक्‍टिव्हिटी वाढवली पाहिजे. नियोजित ड्रायपोर्टला राज्य व केंद्र सरकारने गतीने चालना दिली पाहिजे. 
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी. 

आजारानंतरच्या अशक्तपणावर गुणकारी

पोटॅशियम, लोह, कॅल्शियमचा भरपूर स्त्रोत म्हणून बेदाण्यांचे आहारात महत्त्व आहे. नैसर्गिक साखरेमुळे मधुमेहींनीही ते खावेत. किडणीच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी बेदाणे उपयुक्त आहेत. कुपोषितांसाठी विशेष करून अशा लहान मुलांसाठी बेदाणे आहारात हवेतच. आजारानंतरच्या अशक्तपणावर ते गुणकारी आहेत. रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास पचनास चांगले ठरते. शिरा, खीर, पंजाबी पदार्थात त्यांचा भरपूर वापर केल्यास ते आपोआप शिजवून खाल्ले जातील. 
- आरती शहा, आहार तज्ज्ञ. 

संपादन : युवराज यादव