e
e

कोरोनासह जगण्यासाठी हा देश पुन्हा सज्ज होतोय !

जर्मनी....महायुध्दांच्या झळा सोसलेल्या या देशाकडे जात्याच एक शिस्त आहे. जगभर कोरोनाचे थैमान सुरु झाल्यानंतर अनेक देशांनी त्यावरील उपाययोजनांबाबत एकमेकांचे अनुकरण केले. जर्मनीने मात्र विषाणूच्या वर्तनाच्या अभ्यासापासून सुरवात करीत उपयायोजना केल्या आणि तडीसही नेल्या. जर्मनीत साथ नियंत्रणात आहे आणि आता शेजारच्या देशांनाही हा देश उपचारापासून अनेक पातळ्यांवर मदत करीत आहे.


ऍटोमोबाईल्समधील मास्टर्स पदवीसाठी 2013 मध्ये मी इथं आलो. 2016 पासून मी जॉब करतोय. माझं मुळ गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यातील गव्हाण. मात्र वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मी मुंबईत वाढलो,शिकलो. गेल्या 19 फेब्रुवारीला पत्नी पल्लवी आणि अकरा महिन्याच्या कन्या जयनीसह आम्ही इथे दाखल झालो. इथे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच टाळेबंदी सुरु झाली. कोरोनाचे थैमान टिपेवर असताना इथे दिवसा पाच हजारांवर बळी गेले होते. आता बळींची संख्या दिवसाकाठी तीनशेंवर आली आहे. परस्थिती पुर्ण नियंत्रणाखाली आहे. बाजारपेठेसह आता पुन्हा एकदा सारे काही सुरु होतेय. कोरोनाच्या नव्या नियमावलीसह जगणे झाले आहे.

इथे टाळेबंदी टप्प्या टप्प्याने लागू झाली. पाळणाघरे, शाळा, कार्यालये पहिल्या टप्प्यात बंद झाली. मात्र रेल्वे-बस पहिल्या दिवसापासून सुरु आहेत. घरातून एकानेच बाहेर जायचे आणि आवश्‍यक ती खरेदी करायची. त्यासाठी मॉल्समध्ये पुर्ण सॅनिटाईज केलेल्या ट्रॉलीज खरेदीसाठी दिल्या जायच्या. महायुध्दाच्या झळा सोसलेल्या जर्मनवासियांनी टाळेबंदीच्या तयारी म्हणून सुरवातीला जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीचा इतका सपाटा लावला की शासनाला सांगावे लागले की एवढी खरेदी करु नका. मॉलमध्ये खरेदीवर काही निर्बंधही आणावे लागले. मात्र आठवडाभरातच सारे काही सुरळीत झाले. लोकांनाही जाणीव झाली की ही काय युध्दजन्य स्थिती नव्हे.
कोरोनाच्या साथीला सामोरे कसे जायचे याबद्दल इथल्या पंतप्रधान अजेंला मर्केल यांची धडाडी जर्मनवासियांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. सुरवातीला कोविडने जर्मनीतील हाईन्सबेर्ग या गावात थैमान मांडले. या गावातील साथीचा उद्रेक तपासण्यासाठी त्यांनी गावाचीच जणू प्रयोगशाळा केली. प्रत्येक घराची तपासणी करतानाच तिथले विषाणू नमुने यावर बारकाईने अभ्यास करीत शास्त्रज्ञांच्या टीमने लढाईचा जणू आराखडाच तयार केला. रुग्णांचाही बारकाईने अभ्यास केला. त्या आधारे सर्व वैद्यकीय सज्जता केली.
इथली आरोग्य व्यवस्था खासगी आणि सरकारी अशी दोन्ही प्रकारची आहे. प्रत्येकाला आरोग्य विमा संरक्षण असतंच असतं. त्यामुळे प्रचंड रुग्णसंख्या असूनही उपचाराची हेळसांड झाली असं मात्र झालं नाही. आता तर शेजारी मित्रदेशातील रुग्ण जर्मनीमध्ये हवाई रुग्णवाहिकेद्वारे आणले जात आहेत. गेल्या सोमवारच्या आकडेवारीनुसार फ्रान्समधून 130, इटलीतून 44 तर 55 नेदरलॅंन्डमधून रुग्ण उपचारासाठी इथे आणले. सरकार असं धाडस दाखवतेय त्यातून जर्मनवासियांनाही एक आत्मविश्‍वास मिळाला आहे. त्याचबरोबरच इथले डॉक्‍टर्सं त्याकडे अभ्यासाची संधी म्हणून पाहतात. कोरोनाविरोधातील लस-औषध निर्मितीची तयारी सुरु झाली आहे. इथल्या काही औषध कंपन्यांनी काही अमेरिकन कंपन्यांशी करार केले आहेत. क्‍लिनिकल ट्रायल्स सुरु झाल्या आहेत. शासनाने मात्र अद्यापही लसीच्या दाव्याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
टाळेबंदीने बेरोजगारी-पगार कपातीला इथे सामोरे जावे लागतेय. मात्र त्याच्या झळा शासनाच्या मदतीमुळे तीव्र नाहीत. विमा संरक्षणामुळे बेरोजगारांच्या खात्यावर साठ टक्के पगार जमा होतोय. रोजगार गेलेले आणि मुलं असलेल्यांना शासनाने तीनशे युरो म्हणजे सुमारे 21 ते 24 हजारांपर्यंतची एकरकमी मदत दिलीय. कंपन्यांनी केलेल्या पगार कपातीची भरपाई शासन करतेय.
टाळेबंदी आता संपली असून पुन्हा एकदा जीवन सुरु होतेय. खेळ, चित्रपटगृहे, सभा वगळता सारे काही पुर्ववत होतेय. मात्र आता कोरोनाच्या सोबत जगायचं आहे. त्यासाठी रोजच्या जगण्यात-वर्तनात बरेच नवे नियम लागू झाले आहेत. जर्मनी आता पुन्हा सज्ज होतेय.
............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com