देशातील मोठ्या रकमेची ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

घनशाम नवाथे
Monday, 7 September 2020

देशातील सर्वात मोठ्या रकमेची पहिली ऑनलाईन व प्रवेश फी नसलेली स्पर्धा सोमवारी (ता. 7) आयोजित केली आहे. सचिव चिंतामणी लिमये यांनी ही माहिती दिली. 

सांगली : नूतन बुद्धिबळ मंडळाचे संस्थापक, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त देशातील सर्वात मोठ्या रकमेची पहिली ऑनलाईन व प्रवेश फी नसलेली स्पर्धा सोमवारी (ता. 7) आयोजित केली आहे. सचिव चिंतामणी लिमये यांनी ही माहिती दिली. 

बुद्धिबळमहर्षी भाऊसाहेब पडसलगीकर यांनी सांगलीला बुद्धिबळपंढरी अशी ओळख करून दिली. 1968 मध्ये नूतन बुद्धिबळ मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून 52 वर्षे स्पर्धा भरवल्या जात आहेत. मंडळाचा यंदाचा 53 वा बुद्धिबळ महोत्सव कोरोनामुळे स्थगित करावा लागला; मात्र मंडळाने बुद्धिबळाला चालना देण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा सुरू केल्या. भाऊसाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त देशातील सर्वात मोठ्या पारितोषिकाची स्पर्धा सोमवारी होत आहे. 

ही स्पर्धा सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन पद्धतीने खेळली जाणार असून स्पर्धेची वेळ 5 मिनिटे व 3 सेकंद इनक्रिमेंट अशी असेल. स्पर्धेत खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक 3 हजार रुपये, द्वितीय दोन हजार रुपये, तृतीय हजार रुपये अशी एकूण 50 पारितोषिके आहेत. तर एकूण रक्कम 26 हजार रुपये आहे.

रेटिंगनुसार प्रत्येक गटासाठी प्रत्येकी 15 पारितोषिके तसेच सांगली जिल्ह्यातील वयोगटातील खेळाडूंना 7, 9, 11, 13, 15 वयोगट व उत्कृष्ट सांगली खेळाडूंना प्रत्येकी एक पारितोषिक दिले जाईल. 
नूतन बुद्धिबळ मंडळ व पुरोहित चेस ऍकॅडमीचे श्रेयस पुरोहित यांच्या सहकार्याने स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पंच शार्दूल तपासे, जुईली कुलकर्णी, दीपक वायचळ काम पाहतील. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country's largest online chess tournament from today in Sangali