पोस्टात अपहार करून वर्षभर पसार असलेल्या दांपत्यास अटक

शैलेश पेटकर
Saturday, 9 January 2021

पोस्टातील ठेवीचे लाखो रूपये परस्पर हडप करून वर्षापासून अधिक काळ पसार झालेल्या दांपत्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

सांगली : पोस्टातील ठेवीचे लाखो रूपये परस्पर हडप करून वर्षापासून अधिक काळ पसार झालेल्या प्रकाश कृष्णाजी पवार (वय 60) व उज्वला प्रकाश पवार (वय 48, रा. वसंतनगर, कुपवाड) या दांपत्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित उज्वला पवार या पोस्टातील एजंट म्हणून काम करतात. परिसरातील अनेकजण त्यांच्यामार्फत पोस्टात पैसे गुंतवत होते. प्रकाश पवार यांची भाची वर्षा विश्‍वास मोकाशी (वय 44, रा. पुणे) यांनाही त्यांची मामी उज्वला पवार यांच्यावर विश्‍वास होता. त्याच विश्‍वासातून मोकाशी यांनी त्यांच्यामार्फत पोस्टात पैसे गुंतवले होते.

जवळपास 6 लाख 75 हजार रूपये व्याजासह त्यांचे जमा झाले होते. गतवर्षी त्यांच्या गुंतवणूकीची मुदत पुर्ण होणार होती. तत्पूर्वीच उज्वला पवार यांनी मोकाशी यांच्या परस्परच 6 लाख 75 हजार रूपये पोस्टातून काढून घेतले. मामा-मामीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मोकाशी यांनी पोस्टात जाऊन चौकशी केली. तेव्हा मामीने परस्पर पैसे हडप केल्याचे समजले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला.

दरम्यान तत्पूर्वी उज्वला पवार यांनी दीड वर्षापूर्वी जाखोटिया नामक व्यापाऱ्याचे 15 लाख रूपये देखील अशा प्रकारे परस्पर हडप केल्याचा प्रकार घडला आहे. जाखोटिया यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्याद दाखल झाल्यापासून पवार दांपत्य पसारच झाले आहे. तशातच दोघेजण 

वर्षापासून बेपत्ता झाल्याची फिर्यादही पोलिस ठाण्यात दाखल आहे. पुण्यातील वर्षा मोकाशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहायक निरीक्षक 
अमितकुमार पाटील तपास करत असताना पसार पवार दांपत्याचा ठावठिकाणा समजला. तत्काळ दोघांना गुरूवारी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. 

पोस्टातील कर्मचाऱ्यांवर संशय
उज्वला पवार यांनी गुंतवणूक करणाऱ्या वर्षा मोकाशी यांच्या पश्‍चात परस्पर रक्कम कशी काढून घेतली? असा प्रश्‍न पडला आहे. गुंतवणूकदार नसताना 
पैसे काढले गेल्यामुळे पोस्टातील कर्मचारी किंवा अधिकारी यांचा सहभाग असावा अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple arrested for embezzling postal money & ran away for a year