
जखमी प्राणी-पक्ष्यांची सेवा करणारं दांपत्य
सांगलीतील सुनीता व सचिन शिंगारे हे पती-पत्नी जखमी प्राणी व पक्ष्यांच्या सेवेत समाधान मानतात. आजवर त्यांनी अनेक जखमी पक्ष्यांची देखभाल करून त्यांना निसर्गात सोडलं आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असूनही पदरमोड करून हे दांपत्य मुक्या जीवांच्या शुश्रूषेसाठी धडपडत असतं. सचिन म्हणाले, ‘बालपणापासूनच मला प्राणी व पक्षी फार आवडतात. शाळेचे तास बुडवून तासंतास निसर्गातील जिवांना मी निरखत बसायचो. यामुळे जेमतेम दहावीपर्यंत कसाबसा पोहोचलो. शाळेत कार्यानुभवाच्या तासाला स्क्रीन प्रिंटिंग शिकायला मिळालं. त्यात माझी तयारी झाल्यावर कामं मिळू लागली. पुढे स्वतःचा छोटासा छापखाना सुरू केला. पण पोटापाण्यासाठी कष्ट घेतानाही मुक्या जीवांकडे कायम लक्ष वेधलं जायचं. लग्न ठरताना सुनीताला सांगण्यात आलं की, मुलाची कमाई फार नाही. तो पक्षीमित्र म्हणून सेवा देत असतो. तिला नेमकं तेच आवडलं. लग्नानंतर तीही मला यात मदत करू लागली.’
सचिन म्हणाले, पक्षिप्रेमामुळेच मला अनेक पक्ष्यांची माहिती होत गेली. अभ्यासकांकडून मी विविध पक्ष्यांची शास्त्रीय नावंही जाणून घेतली. कोणत्या पक्ष्यावर कुठल्या तारखेला, कोणते उपचार केले, त्याला बरं व्हायला किती कालावधी लागला, केव्हा सोडलं वगैरे तपशीलवार माहिती मी नोंदवहीत टिपून ठेवतो. पक्ष्यांसाठी प्लायवुड, आंब्याच्या पेट्यांचं लाकूड व पुठ्ठे यांसारख्या साहित्यातून घरटी बनवू लागलो. जवळच्या देवळाच्या परिसरात काही घरटी बसवली. त्यांत पाखरं दिसू लागल्यावर हुरूप वाढला. आतापर्यंत सुमारे सातशे घरटी तयार केली. काही आम्हीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लावली. वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केल्यानंतर बऱ्याचजणांनी ती नेऊन आपापल्या परिसरात लावली. यामुळे अनेक पक्ष्यांची सोय झाली.
धडपड पुनर्वसन केंद्र उभारण्याची
वन्यजीवांवर उपचार करताना आम्ही वनविभागाला कळवतो. संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करतो. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या सेवेची गरज भासते. पुढील काळात चांगलं पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी पैसे जमवायच्या उद्देशाने रोज सकाळी हर्बल चहाची गाडी लावतो. लोकांना आरोग्यदायी चहा मिळतो आणि आमच्याकडे हळूहळू निधी जमा होतो आहे.
Web Title: Couple Serving Injured Animals And Birds Motivation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..