esakal | रांगाच रांगा; "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं'

बोलून बातमी शोधा

रांगाच रांगा; "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं'
रांगाच रांगा; "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं'
sakal_logo
By
अजित झळके

सांगली : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर लसीकरणासाठी लोकांची गर्दीही वाढली आहे. जानेवारीत अतिशय कासवगतीने सुरू झालेल्या या मोहिमेत आता लोक रांगा लावून लस घेताहेत. आतापर्यंत पहिली आणि दुसरी अशा सुमारे चार लाख लसी दिल्या गेल्या आहेत. गेल्या एक महिन्यात लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढला आहे. लसीबद्दलचा विश्‍वास, कोरोनाची दुसरी लाट आणि 45 वर्षांवरील सर्वांसाठी मोफत लस, यामुळे हा वेग वाढतच जाणार आहे. त्या तुलनेत लस उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. ही मोहीम आता अधिक व्यापक करून खासगी रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जिल्ह्यात दररोज आठशे ते नऊशे रुग्ण आढळत आहेत. दररोजचे बळी 14 ते 17 आहेत. हा वेग झपाट्याने वाढला आहे. "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', हे लोक जाणून होते, मात्र लस आल्यानंतरही त्याकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. लस सुरक्षित आहे का? याविषयी शंका होत्या. सामान्य माणूसच नव्हे तर शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकाही लस घ्यायला घाबरत होत्या. आता कोरोना झपाट्याने वाढतोय आणि बेडची उपलब्धता कठीण होतेय, हे लक्षात आल्यानंतर लोक रांगेत उभे राहिले आहेत.

13 हजार लोकांनी घेतली विकत लस

कोरोना लसीकरण वाढवायचे असेल तर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवावा लागेल, असा एक जाणकारांचा सूर आहे. कारण, शासकीय रुग्णालयांची यंत्रणा, तेथील कर्मचारी संख्या हे पाहता लोकसंख्येच्या तुलनेत यंत्रणा अपुरी पडणार आहे, पडत आहे. आतापर्यंत खासगी रुग्णालयांत 13 हजार लोकांनी लस घेतली आहे. येथे लसीकरणासाठी 250 रुपये शुल्क आकारले जाते. ज्यांना शुल्क देऊन लस घेणे शक्‍य आहे, त्यांना ती सहज उपलब्ध झाली पाहिजे.

अखेर "को-वॅक्‍सिन' आली

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात "को-वॅक्‍सिन' लस दिल्या गेल्या. सुमारे 25 हजार लोकांनी ही लस घेतली. त्यानंतरच्या टप्प्यात कोविशिल्ड लस जास्त प्रमाणात आल्या. त्यामुळे "को-वॅक्‍सिन'चा पहिला डोस घेतलेल्या लोकांना दुसरा डोस घेण्यास विलंब होत होता. त्यामुळे या लसी लवकर मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर रविवारी को-वॅक्‍सिनचे 6 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यातून फक्त दुसरी लसच दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मनपा क्षेत्रात 48 टक्के लसीकरण

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात खासगी आणि सरकारी मिळून29 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. 45 वर्षांवरील एक लाख 68 हजार 031 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. आजवर 81 हजार 330 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उद्दिष्टाच्या 48 टक्के लसीकरण झाले आहे.

असा वाढला वेग

* 23 जानेवारी ः 900

* 23 मार्च ः 1 लाख 22 हजार 871

* 31 मार्च ः 1 लाख 60 हजार 192

* 15 एप्रिल ः 3 लाख 69 हजार 192

लसीकरणाची स्थिती (18 एप्रिलअखेर)

*वर्ग *पहिला डोस * दुसरा डोस

*आरोग्य कर्मचारी *25,300 *13,814

*फ्रंटलाईन वर्कर्स *20,583 *6,413

*60 वर्षांवरील ज्येष्ठ *1,79,166 *5,030

*45 वर्षांवरील *1,45,850 *1,788

*एकूण *3,70,899 *27,045

...

कुठल्या केंद्रावर किती लसीकरण

प्राथमिक आरोग्य केंद्र ः 1,46,642

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ः 1,14,120

ग्रामीण रुग्णालय व उपकेंद्र ः 52,640

अन्य रुग्णालये ः 70,716

खासगी रुग्णालये ः 13,826

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका या तीनही पातळीवर लसीकरणासाठी एक व्यापक मोहीम राबवली गेली. शहरी, ग्रामीण लोकांमध्ये लस ही किती गरजेची आणि सुरक्षित आहे, याचा विश्‍वास निर्माण केला. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी चांगला पुढाकार घेतला आहे. अनेक ठिकाणी लसीकरणाला लोक आणण्यासाठी वाहनांची सोय केली गेलीय. रुग्णालयांबाहेर मंडप, पिण्याचे पाणी अशा सोयी केल्या आहेत.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी

लसीकरण सुरू झाले तेव्हा लोक थोडे घाबरत होते. टाळाटाळ केली जात होती. आता लोक विश्‍वासाने लस घेत आहेत. आम्हाला आता फार विनंती करावी लागत नाही. लोक स्वतःहून पुढे येत आहेत. गेल्या महिनाभरात हा बदल दिसतो आहे.

- मनीषा चव्हाण, आशा वर्कर, मिरज

Edited By- Archana Banage