सातारा ः व्वा क्वारंटाइनमध्ये वृक्षनिर्मितीचा ध्यास

Satara
Satara

पुसेसावळी (जि. सातारा) ः कोविड 19 च्या धास्तीने मुंबई- पुण्यासह इतर राज्यांत नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले गावकरी पुन्हा आपल्या मायभूमीकडे परतू लागले आहेत. मात्र, गावाकडे आल्यावर बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला 15 दिवस विलगीकरण (क्वारंटाइन) केले जात आहे. त्यातील काही जण प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करत आहेत, तर काहींनी गावकारभाऱ्यांच्या नाकी दम आणला आहे. मात्र, नागझरी (ता. कोरेगाव) येथील मुंबई, पुणे, नाशिकहून आलेल्या ग्रामस्थांनी क्वारंटाइनमध्ये हजारो वृक्षनिर्मितीचा ध्यास घेत सीड बॉल तयार केले आहेत. 

खटाव आणि कोरेगाव तालुक्‍यांच्या सरहद्दीवर नागझरी हे डोंगर पायथ्याला वसलेले छोट गाव. गावातील अनेक ग्रामस्थ हे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे व इतरत्र राहात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या आजाराने राज्यभर थैमान घातल्यामुळे यातील अनेक ग्रामस्थ पुन्हा एकदा आपल्या मायभूमीकडे परतले आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार अशा नागरिकांना गावाकडे आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाइन व्हावे लागत आहे. नागझरीतील मुक्ताबाई भोसले हायस्कूलच्या वसतिगृहात ही सोय करण्यात आली आहे. 
सुरुवातीला नाशिकवरून आलेल्या सात ते आठ जणांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्यानंतर शाळा परिसरातील झाडांची स्वच्छता करून त्यांना पाणी घालणे असा दैनंदिन उपक्रम सुरू केला. एवढे करूनही रिकामा वेळ जात नसल्याने यांच्यातील रत्नाकर जाधव आणि महेंद्र भोसले यांनी "सीड बॉल'ची कल्पना पुढे आणली. शंकर भोसले यांनी त्यांना मार्गदर्शन केले. गावकऱ्यांकडून शेण, माती, अनेकविध वृक्षांच्या बिया मागवल्या. ग्रामस्थांनी त्यात चिंच, करंज, लिंब, सीताफळ, रामफळ या सारख्या वृक्षांच्या बिया या लोकांना पुरवल्या. बघताबघता सुमारे 450 सीड बॉल या क्वारंटाइनवर असणाऱ्या 40 ते 50 ग्रामस्थांनी तयार केले. अजूनही अशा बॉलची निर्मिती सुरू असून, येणाऱ्या पावसाळ्यात हे सर्व सीड बॉल डोंगर परिसरात रुजणार आहेत. 

एकीकडे मुंबई- पुण्यावरून येणाऱ्या लोकांनी प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून गाव कारभाऱ्यांनी जेरीस आणले असताना नागझरीमध्ये मुंबई- पुणेकरांनी प्रशासनाचे नियम पाळून सामाजिक बांधिलकी जपत गावातील लोकांना आणि समाजाला एक सुखद धक्का दिला आहे. 


""नागझरीत मुंबई- पुणे व इतर जिल्ह्यांतून आलेल्या ग्रामस्थांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रिकाम्या वेळेत या ग्रामस्थांनी "सीड बॉल'ची केलेली निर्मिती आमच्या गावासाठी प्रेरणादायी काम आहे. 15 दिवस हे ग्रामस्थ प्रशासनाचे नियम काटेकोर पाळत होते. माझ्यासह सर्व गाव त्यांचे अत्यंत ऋणी आहे.'' 

- जितेंद्र भोसले, सरपंच, नागझरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com