वाळवा तालुक्‍यात कोविड हॉस्पीटल उद्‌घाटनानंतर कोरोनाचे फुटले "पेव' 

शांताराम पाटील
Thursday, 27 August 2020

गेल्या आठ दिवसापुर्वी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलच्या उद्‌घाटनानंतर वाळवा तालुक्‍यात कोरोनाचे " पेव ' फुटले आहे.

इस्लामपूर : गेल्या आठ दिवसापुर्वी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पीटलच्या उद्‌घाटनानंतर वाळवा तालुक्‍यात कोरोनाचे " पेव ' फुटले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या अथवा विनाकारण लुडबूड करणाऱ्या अनेक राजकीय पदाधिकारी, नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाने आपला डंख मारला आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अनेकांनी स्वतःला होमक्वारंटाईन करुन " आमची जिरली, आता इतरांनी सार्वजनिक ठिकाणचा वावर टाळावा ' असा संदेश खासगीत देण्यास सुुरुवात केली आहे. 

आठ दिवसापुर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य मंत्री विश्‍वजीत कदम, आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या कोविड उपचार केंद्राचा उद्‌घाटन सोहळा पार पडला. या उद्‌घाटन सोहळ्यासाठी प्रमुख मंत्री उपस्थित असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. उपजिल्हा रुग्णालयात उद्‌घाटन सोहळा पार पाडून येथील राजारामबापू नाट्यगृहात आढावा बैठक व कौतुक सोहळा पार पडला. 

या कौतुक सोहळ्यानंतर काही दिवसातच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोनाने आपला डंख मारला आहे. सोशल डिस्टन्सींगचा फज्जा व जमावबंदी आदेशाची पायमल्ली या कार्यक्रमात झाली. मात्र अंमलबजावणी करणारेच या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने बोलणार कोण ? असा प्रश्‍न उपस्थित झाला. सोहळा पार पडला. त्यानंतर लगेचच कार्यक्रमाचा इफेक्‍ट सुरु झाला. काही नगरसेवक, काही अधिकारी व काही नेते गेल्या आठ दिवसात एक एक करुन कोरोना बाधीत येऊ लागले आहेत. 

या कार्यक्रमानंतर ज्यांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेत त्यांनी खासगीत " आम्हाला उद्‌घाटन सोहळ्याचा प्रसाद म्हणून कोरोनाने गाठले ' अशी प्रतिक्रीया दिली आहे. तर अनेकांनी स्वतःला कोरोनाबाधीत झालेल्या प्रशासकीय अधिकारी व नेत्यांच्या संपर्कात आल्याने घरात क्वारंटाईन करुन घेतले आहे. वास्तविक गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा विळखा जोरदार आवळू लागला आहे. त्याचे गांभीर्य ओळखून अगदी मोजक्‍याच लोकांनी हा उद्‌घाटन सोहळा पार पाडायला पाहिजे होता; मात्र तसे न झाल्याने अनेकांना बाधा झाल्याची चर्चा सुरु आहे. 

पदाधिकारी, अधिकारी पॉझीटीव्ह
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पदाधिकारी व अधिकारी पॉझीटीव्ह आले. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनावेळी लुडबुड करीत होते. मात्र पॉझीटीव्ह आल्यानंतर या सर्वांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचार न घेता कोल्हापूर, मुंबई किंवा अन्य ठिकाणी उपचारासाठी धुम ठोकली आहे. 

 

 संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covina erupts after inauguration of Kovid Hospital in Valva taluka