मृत्यूसोबत भावनांचाही झाला अंत : निगेटिव्ह असताना अंत्यसंस्काराला नकार

अनिता माने
Saturday, 5 September 2020

कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असूनही ग्रामस्थांनी प्रेताला हात लावण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेचा नाईलाज झाला. शेवटी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वाहनचालकावर आली. 

विसापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने नातीगोती, पै-पाहुणे दुरावलेत, हे खरे आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर एरवी त्याच्या प्रेमापोटी गोळा होणाऱ्या गावचे गावपणही कोरोनाने हिरावून घेतले आहे. माणसं आता स्वकेंद्रीत झाल्याने त्याचे भयावह परिणाम समाजमनावर होताना दिसत आहेत. अशीच एक माणुसकी नष्ट करणारी घटना मोराळे (ता. तासगाव, जि . सांगली) येथे घडली. मृत्यूसोबतच भावनांचाही अंत झाल्याचे उदाहरण गावात घडले. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असूनही ग्रामस्थांनी प्रेताला हात लावण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेचा नाईलाज झाला. शेवटी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वाहनचालकावर आली. 

मोराळे (ता. तासगाव) येथील एकाला श्वसनाचा त्रास होता. मांजर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश महांगिरे यांनी या दांपत्याची कोरोना रॅपिड अँन्टिजेन चाचणी केली. पत्नी पॉझिटिव्ह तर पतीची चाचणी निगेटिव्ह आली. गृह विलगीकरणादरम्यान पतीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डॉ. महांगिरे मध्यरात्री एक वाजता पोहोचले. तत्पूर्वी संबंधित व्यक्ती मृत झाली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र पत्नी पॉझिटिव्ह असल्याने पतीला हात लावण्यास कोण तयार होईना. आप्तस्वकीय, नातेवाईक, शेजारी-पाजारीही घाबरुन पुढे येईनात.

गावकऱ्यांनीही अंग काढून घेतले. प्रेत ठेवायचे तरी किती वेळ, हा प्रश्‍न होता. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. महांगिरे व वाहनचालक संतोष करांडे यांनी प्रेत थेट स्मशानभूमीत नेले. रचलेल्या सरणावर मृतदेह ठेवला. दरम्यान, पुन्हा एकदा मृत व्यक्तीची रॅपिड अँन्टिजेन चाचणी केली. विशेष म्हणजे तेव्हाही ती निगेटिव्ह आली. मात्र मुलबाळ नसलेल्या या दांपत्याची परवड सुरुच राहिली. कोरोनाबाबतचे केवळ अज्ञान व भीतीपोटी ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारास नकार दिल्याने संवेदना बोथट झाल्याचे स्पष्ट झाले. 

अंत्यसंस्काराला अडचण नाही 
गेली सहा महिने जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आता प्रेत उचलण्याची वेळ आली आहे. या घटनेने समाजातल्या संवेदना खरंच बोथट झाल्यात की काय, अशी शंका येते. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये, निगेटिव्ह व्यक्तीचा अंत्यविधी करण्यास कोणतीही जोखीम नसल्याचे डॉ.महांगिरे यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cremation nrejected even body was Corona negative at Morale-Tasgao