खासदार सायबांना कोरोना झाल्याचे कळल्यावर लय रडलो

धर्मवीर पाटील
Monday, 14 September 2020

खासदार सायबांना कोरोना झाल्याचे कळल्यावर लय वाईट वाटलं... लय रडलो... साहेब हायती म्हणून आपण हाय... नायतर ही बाकीची आपली गिधाडावानी लचकं तोडतील... अशा भाषेत आपली वेदना आणि तळमळ व्यक्त करणाऱ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऑडिओ कॉल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

इस्लामपूर (सांगली) : खासदार सायबांना कोरोना झाल्याचे कळल्यावर लय वाईट वाटलं... लय रडलो... साहेब हायती म्हणून आपण हाय... नायतर ही बाकीची आपली गिधाडावानी लचकं तोडतील... अशा भाषेत आपली वेदना आणि तळमळ व्यक्त करणाऱ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऑडिओ कॉल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती व्हायरल करत कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. हा व्हिडिओ आणि त्यांचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान दोनच दिवसात श्री. शेट्टी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतरही श्री. शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपण ठीक असल्याचा संदेश दिला होता. तो व्हिडीओदेखील व्हाट्सअप्पवर सर्वत्र फिरला.

हा व्हिडीओ पाहून वाळवा तालुक्यातील कामेरी येथील खासेराव निंबाळकर नावाच्या एका शेतकऱ्याने वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना कॉल केला आहे. त्यात त्यांनी श्री. शेट्टी यांच्याविषयी तळमळीची भावना व्यक्त केली आहे. "साहेब हायतं म्हणून आपण हाय, कुकवाचं धनी असत्यात तसं हायती सायेब आमच्यासाठी... साहेबांचं समजल्यावर मी दोन-तीन देवरुशांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की, जरा वेळ लागेल पण सायेब लवकर बरे होतील, मला समजल्यावर मी सगळयांना फोन लावला..." असे म्हणत "सायबांचं आणि काय कळलं तर सांगा..." असे म्हणणारे खासेराव अनेकांच्या भावनेला हात घालतायत.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळालेले महत्त्व सर्वश्रुत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नेत्याला झालेली लागण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. त्याचेच हे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cried when he heard that MP had become a corona