कोल्हापूर : जुगार खेळण्यास नकार दिल्याच्या रागातून वृद्धास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - जुगार खेळण्यास नकार दिल्याच्या रागातून वृद्धास मारहाण करून त्याच्या खिशातील साडेचार हजाराच्या रोकडसह पाच मशिन जबरदस्तीने नेल्याप्रकरणी संशयित कुणाल रणजित परमार (वय 30, रा. गुजरी भेंडेगल्ली) याच्यासह चौघांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार दाभोळकर कॉर्नर येथील व्हिडीओ पार्लरमध्ये मंगळवार (ता.10) सायंकाळी घडला. 

कोल्हापूर - जुगार खेळण्यास नकार दिल्याच्या रागातून वृद्धास मारहाण करून त्याच्या खिशातील साडेचार हजाराच्या रोकडसह पाच मशिन जबरदस्तीने नेल्याप्रकरणी संशयित कुणाल रणजित परमार (वय 30, रा. गुजरी भेंडेगल्ली) याच्यासह चौघांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार दाभोळकर कॉर्नर येथील व्हिडीओ पार्लरमध्ये मंगळवार (ता.10) सायंकाळी घडला. रुपेश सुर्यवंशी (वय 30, रा. महाराणा प्रताप चौक, सोमवार पेठ), अमित साळोखे (वय 25, रा. कनाननगर) आणि अनोळखी माल वाहतूक रिक्षाचालक अशी अन्य संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, प्रभाकर बाबुराव मिरजकर (वय 71, रा. मूळ रा. केर्ले, ता. करवीर, सध्या रा. सुभाषनगर) आणि जयदीप सरनाईक हे दोघे दाभोळकर कॉर्नर येथील रिच व्हिडीओ नावाचे सेंटर चालवतात. मंगळवारी (ता.10) सायंकाळी संशयित कुणाल परमार, रुपेश सुर्यवंशी, अमित साळोखे व रिक्षा चालक असे चौघेजण गेले होते.

यातील रूपेशने मिरजकर व सरनाईक या दोघांना "तुमच्या लक्ष्मीपुरीतील व्हिडीओ सेंटरची वाट लावून आलो आहे. मला जुगार खेळायचा आहे. मला दोन हजार रूपयाचे टोकन दे' अशी मागणी केली. मात्र मिरजकर यांनी त्याला जुगार खेळण्यास इथे बंदी आहे. असे सांगितले. याचा त्याला राग आला. त्याने मी सांगतो तसं कर असे म्हणत चौघांनी प्रभाकर यांना मारहाण तर जयदीप यांना धक्काबुक्की केली. तसेच मिरजकर यांच्या खिशातील साडेचार हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. यानंतर कुणाल व अमित या दोघांनी पार्लरमधील पाच मशीन्स्‌ उचकटून काढून ती मालवाहतूक रिक्षांतून जबरदस्तीने चोरून नेली.

याप्रकरणी मिरजकर यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित कुणाल, रूपेश, अमित व रिक्षा चालक अशा चौघांवर 1 लाख 29 हजार 500 रूपयाची मशिन्स्‌ आणि साडेचार हजाराची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against Kunal Parmar in Theft case in Kolhapur