कवठेएकंदच्या सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा; इतक्या गैरव्यवहाराचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कवठेएकंदच्या सरपंच ज्योती गुरव आणि ग्रामसेवक चंद्रकांत राजमाने यांच्यावर चार लाख 30 हजार 600 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याबद्दल आज तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तासगाव (जि. सांगली) : कवठेएकंदच्या सरपंच ज्योती गुरव आणि ग्रामसेवक चंद्रकांत राजमाने यांच्यावर चार लाख 30 हजार 600 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याबद्दल आज तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंडेवार यांनी दिले होते. 

याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी तासगाव पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत म्हटले आहे, की 11 ते 17 डिसेंबर 2019, तसेच 19 जून 2020 ला वेळोवेळी कवठेएकंद ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे ग्रामसेवक चंद्रकांत तातोबा राजमाने (वय 53, रा. तासगाव) यांनी व सरपंच ज्योती दीपक गुरव (30, रा. कवठेएकंद) स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून ग्रामनिधीतून गटारीचे काम करण्याबाबत कवलापूर (ता. मिरज) येथील मजुरांची नावे दाखवून मजुरांची खोटी माहिती भरून बनावट हजेरी मस्टर तयार केले.

त्यावर मजुरांचे पैसे दिले. याबाबत सह्या करून सदरचा बनावट दस्तऐवज स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी खरा म्हणून वापरून कवठेएकंद गावातील वाढीव पाईपलाईन, रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी उपअभियंता यांच्याकडून कोणतेही मोजमाप करून न घेता व प्रत्यक्ष जागेवर काम न करता कंत्राटदार दत्तकुमार रावसाहेब माळी (रा. मालगाव) यांच्या नावे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी धनादेश क्र. 810 व 12040333 द्वारे प्रत्येकी रक्कम दोन लाख रुपये अशा एकूण चार लाख 30 हजार 600 रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी सरपंच गुरव आणि ग्रामसेवक राजमाने यांच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against Sarpanch, Gram Sevak of Kavtheekand; Allegations of so much abuse