
विन्सेंटचा ४ जोनवारीस गवतगंजीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.
खानापूर (बेळगाव) : तिओली वाडा (ता. खानापूर) येथील विन्सेंट ऊर्फ इशांती बस्त्याव परेरा (वय २७) याचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ॲलेक्स परेरा याला अटक केली असून अन्य तिघे फरारी आहेत. विन्सेंटचा ४ जोनवारीस गवतगंजीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.
विन्सेंटचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला बोलवून घेऊन गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा मिटविण्यासाठी त्याचा मृतदेह गवतगंजीत टाकून पेटवून दिला. त्याने स्वत:च गवतगंजीत झोकून देऊन आत्महत्या केल्याचा बनाव संशयित आरोपी ॲलेक्स परेरा व त्याच्या साथीदारांनी रचला. ४ जानेवारीला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सा केली. सुरुवातीपासून त्याचा खून झाला असण्याची शक्यता होती. त्या दिशेने तपास केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
हेही वाचा - ‘प्रचाराची वेळ संपली आहे आणि तुम्ही आता असे चिन्ह दाखवू शकत नाही'
विन्सेंटने स्वत:च गवतगंजीत झोकून देत पेटवून घेतले असते तर पोळल्यानंतर त्याने गवतगंजीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता, पण मृतदेह गवतगंजीतच राहिल्याने पोलिसांना संशय आला. तसेच शवचिकित्सा अहवालात त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तपासानंतर ॲलेक्सला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. अन्य तिघांचा शोध जारी असून पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील अधिक तपास करीत आहेत.
संपादन - स्नेहल कदम