बेळगावात 26 लाखांची चोरी; सोन्या-चांदीसह रोख रक्‍कमही लंपास

crime case in belgaum rupees 26 lakh theft from thief gold and silver
crime case in belgaum rupees 26 lakh theft from thief gold and silver
Updated on

बेळगाव : सराफी दुकान फोडून २६ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी (१७) सकाळी श्रीनगरमध्ये उघडकीस आली. चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर उचकटून ही चोरी केल्याचे घटनास्थळी स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रामतीर्थनगरमधील राघवेंद्र कृष्णा दैवज्ञ यांचे श्रीनगरला सराफी दुकान आहे. मंगळवारी (१६) रात्री श्री. दैवज्ञ नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते.

बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटर उचकटल्याचे व कुलूप तोडल्याचे त्यांना आढळून आले. आत जाऊन पाहिल्यानंतर दुकानातील सोने आणि चांदीचे दागिने व रोख रक्‍कमही गायब असल्याचे त्यांना दिसून आले. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने माळमारुती पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले. त्यानंतर त्यांनी पंचनामा करून मालक दैवज्ञ यांच्याकडून तक्रार नोंदवून घेतली. त्यानुसार सुमारे २६ लाख २८ हजार ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने दुकानातून चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. त्यानुसार माळमारुती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळमारुती पोलिस पुढील तपास करत आहेत. शहर परिसरात चोरी व लुटमारीच्या घटना वाढत असतानाच बुधवारी मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली. लुटमार करणाऱ्या टोळीने हैराण केले असल्याने दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी सापळा रचून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. आता शहर परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांसमोर याचा छडा लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या १५ दिवसांत तीन मोठ्या चोऱ्या झाल्याने नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे.

संपूर्ण दुकानच केले साफ

चोरट्यांनी सराफ दुकानामधील जवळपास सर्वच दागिने आणि साहित्य लांबविल्याने पूर्ण दुकान मोकळे झाले आहे. यामुळे दुकान मालक अचंबित झाले आहेत, तर पोलिसही चक्रावून गेले आहेत. काचेच्या कपाटांसह इतर ठिकाणी असलेले दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी संपूर्णपणे नेली आहे. अशाप्रकारची चोरी पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

"श्रीनगर येथे घडलेल्या चोरीची मला माहिती मिळाली आहे. आज मी एका खटल्यातील साक्षीसाठी रायचूरला आलो आहे. उद्या सकाळी बेळगावला पोहचल्यानंतर घटनेची सखोल माहिती घेऊन घटनास्थळीही भेट देणार आहे."

- चंद्रशेखर निलगार, गुन्हे व वाहतूक नियंत्रण, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com