भामट्याने रोहितच्या मानेवर केले धारदार शस्त्राने वार अन् २ लाखांचे दागिने केले लंपास

गणेश जाधव
Wednesday, 17 February 2021

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दिघंची (सांगली) : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आज दुपारी दोनच्या दरम्यान मुख्य बाजारपेठेत दत्ता यादव यांच्या मालकीच्या शुभम ज्वेलर्समध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. दुकानात असणाऱ्या रोहित दगडू भोसले (वय 22) याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करुन दुकानातील कपाटाच्या काचा फोडून 53 ग्रॅम सोने पळवले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी सोने खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात प्रवेश करुन रोहित भोसले यांच्या मानेवर धारधार शस्त्राने वार केला. तर दुसरा वार त्याच्या मोबाईल वर बसला. दुकानातील कपाटाच्या काचा फोडून सोने ठेवलेले चार ट्रे बॅगेत ठेवले. या ट्रेमध्ये दोन लाखाहून जास्तीचा ऐवज होता.

हेही वाचा - अनिकेत आणि सानिकाच्या निर्णयाने गावात स्मशान शांतता ; दोघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला याचीच चर्चा

दरम्यान रोहित भोसले केली आरडा ओरड केली असता, तू माझे पैसे का दिले नाहीस, पैसे कसे देत नाहीस असे म्हणत दुकानातून बाहेर पडले आणि सोने घेऊन पसार झाले. ही तालुक्यातील सर्वात मोठी व्यापरपेठ असुन ज्वेलर्सची संख्याही अधिक आहे. काही दिवसांपूर्वी आदिती ज्वेलर्स फोडण्यात आले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case in sangli jewellery shop theft from two youngsters in sangli