
अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी खात्यात अनधिकृत जमा झालेले 1 लाख तीस हजार रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.
नेर्ले (सांगली) : येथील नेर्ले सेवा सोसायटी नं 1 संस्थेमध्ये कर्ज प्रकरणासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून 3 लाख 40 हजार 500 रुपयांचा अपहार करून संस्थेस व जिल्हा बॅंक शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन सचिव व तत्कालीन बॅंक निरीक्षक यांच्याविरोधात कासेगाव पोलिसांत उपलेखापरीक्षक मानसिंग शिवाजीराव देसाई यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 25 एप्रिल 2016 रोजी सोसायटी नंबर 1 ने रविराज पाटील यांना दीड लाख रुपये, श्रीमती शैलजा प्रकाश पाटील यांना दीड लाख रुपये तर प्रसन्ना प्रकाश पाटील यांना 65 हजार रुपये असे एकूण 3 लाख 65 हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी रविराज पाटील यांना 1 लाख 30 हजार 500 रुपयांच्या चेक दिला होता. रविराज पाटील यांनी रोख रक्कम काढल्याचे भासवून निरीक्षक दिलीप आरळेकर यांनी त्यांचा अकाउंट पे चेक खात्यामध्ये जमा केला नाही. अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी खात्यात अनधिकृत जमा झालेले 1 लाख तीस हजार रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.
हेही वाचा - खवय्यांनो, जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीची दूध आमटी माहिती आहे का ?
रविराज पाटील यांची नावे खोटी व बनावट कागदपत्रे सचिव जयवंत हनुमंत पाटील यांनी अध्यक्षांना मदत करण्याच्या दृष्टीने तयार केली. निरीक्षक यांनी पडताळणी न करता रक्कम अध्यक्षांच्या नावे जमा करणे करता मदत केली. सह्या व कागदपत्रे बनावट असतानाही निरीक्षक यांनी बेपर्वाई केली. संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव गुंडा पाटील, तत्कालीन सचिव जयवंत हणमंत पाटील व जिल्हा बॅंक निरीक्षक दिलीप लक्ष्मण आरळेकर या तिघांनी मिळून संगनमत करून नेर्ले नं 1 सर्व सेवा सहकारी सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा नेर्ले ची 3 लाख 40 हजार 500 रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद उपलेखा परीक्षक मानसिंग शिवाजीराव देसाई यांनी कासेगाव पोलिसांत दिली आहे. तपास कासेगाव पोलिस करीत आहेत.
"या संपूर्ण प्रकारात असा कोणताही अनुचित आर्थिक अफरातफर किंवा गैरप्रकार संस्थेकडून व आमच्याकडून घडलेला नाही. आमच्या बदनामीसाठी ही तक्रार करण्यात आली आहे. याबाबतचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत."
- सर्जेराव पाटील, अध्यक्ष, नेर्ले सर्व सेवा सोसायटी नं 1
संपादन - स्नेहल कदम