पोटच्या गोळ्यानं केला घात; मालमत्तेच्या वादावरुन बापाचा केला खून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

मुलगा सोमनाथ हा आपल्या पत्नीसोबत विभक्त राहत होता.

बेळगाव : मालमत्तेच्या वादातून मुलाने चाकू भोसकलेल्या जखमी पित्याचा शनिवारी (६) उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. लक्ष्मण लक्काप्पा शिरूर (वय ५७, रा. पाटील मळा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सोमनाथ लक्ष्मण शिरूर (वय ३०) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, संशयित असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. मुलगा सोमनाथ हा आपल्या पत्नीसोबत विभक्त राहत होता. तर वडील लक्ष्मण हे आपल्या मुलीसोबत राहत होते. 

हेही वाचा - खवय्यांनो, जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीची दूध आमटी माहिती आहे का ?

मालमत्ता आणि पैशाच्या कारणावरून बाप-लेकामध्ये वारंवार खटके उडत होते. गुरुवारी (४) सायंकाळी सोमनाथने वडिलांशी पुन्हा वाद घातला. त्याचवेळी त्याने रागाच्या भरात वडील लक्ष्मण यांच्या पोटात चाकू भोसकला. त्यामुळे त्यांना गंभीर जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime cases in belgaum son attack father and he died reason estate