esakal | दारू सोडण्यास सांगितल्याने आत्महत्या; खडकलाटची घटना
sakal

बोलून बातमी शोधा

दारू सोडण्यास सांगितल्याने आत्महत्या; खडकलाटची घटना

दारू सोडण्यास सांगितल्याने आत्महत्या; खडकलाटची घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकलाट (बेळगाव) : पत्नी, आई, वडील, भाऊबंद आणि मित्रांनी दारू पिऊ नकोस, असे सांगितले. त्यामुळे आपला अपमान झाला, असे समजून दारूच्या नशेत घरातील तुळईस गळफास घेऊन खडकलाट येथील युवकाने आत्महत्या केली. येथील पोलिस स्थानकाच्या हद्दीत लक्ष्मी कोडी (मायाण्णा कोडी) येथे शुक्रवारी (ता. १६) पहाटे ही घटना घडली. संजय पिरू उदंडे (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत खडकलाट पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी, येथील लक्ष्मी कोडीमध्ये संजय उदंडे आपली पत्नी आणि मुलांसोबत रहात होता. आई, वडिलांपासून तो विभक्त झाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. रोज इतरत्र शेतीच्या कामाला जावून मिळणाऱ्या पगारातून दारू पित होता. सासू आणि सासऱ्यांच्या मदतीने त्याची पत्नी रोज इतरांच्या शेतात कामाला जावून संसारला हातभार लावते. रोज सायंकाळी घरात दारू पिऊन संजय बायको, आई आणि वडिलांना कोयता, कुऱ्हाडीसह मिळेल त्या वस्तूने मारहाण करत होता. त्यामुळे घरच्यांनी समाजातील आणि मित्रांना दारू सोडण्याबाबत संजयला समजावून सांगण्याची विनंती केली.

याबाबत अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला याचा अपमान वाटल्याने शुक्रवारी (१६) पहाटे पत्नीला घराबाहेर काढून तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने घराचे दार उघडून पाहताच त्याने गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती पोलिस स्थानकात कळविल्यानंतर उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय डी. बी. कोतवाल, हवालदार कडलस्कर आणि पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अधिक तपास उपनिरीक्षक सुरेश मंटूर करत आहेत.