सांगली : पैशाच्या वादातून महिलेचा केला खून, नेर्लीतील घटना

crime cases in sangli one lady death police arrested by accused
crime cases in sangli one lady death police arrested by accused

इस्लामपूर (सांगली) : 9 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या आणि 2 दिवसांपूर्वी बहे गावच्या हद्दीतील ओढ्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मंगल पांडुरंग गुरव (वय 46, रा. नेर्ले, ता. वाळवा) या महिलेचा खून झाल्याचे आज उघडकीस आले. याप्रकरणी अशोक पांडुरंग डेळेकर (वय 46, रा. कापूसखेड, ता. वाळवा) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली असून, मंगल यांनी केलेल्या पन्नास हजार रुपयांच्या मागणीवरून झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली आहे. उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते. 

ते म्हणाले, "9 एप्रिलला बहे गावच्या हद्दीत अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. तत्पूर्वी 5 एप्रिलला कासेगाव पोलिस ठाण्यात मंगल गुरव बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा अक्षय पांडुरंग गुरव याने दाखल केली होती. त्यानुसार ही महिला तीच असल्याची ओळख पटली होती. 2 एप्रिलला मंगल गुरव सायंकाळी साडेसातच्या सुमारास तासाभरात येते, असे सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर 9 एप्रिलला दुपारी 12 वाजता मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्‍याच्या डाव्या व उजव्या बाजूला गंभीर जखम असल्याचे व गळा आवळल्याचे लक्षात आले. यात चेहऱ्यावरील उजव्या बाजूचे व कवटीचे हाड तसेच दात तुटल्याचे आढळून आले. यात घातपात झाल्याचा संशय आल्याने, इस्लामपूर पोलिसांत अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. 

तपासादरम्यान मृतदेह मिळालेली जागा व प्रेताची परिस्थिती यावरून संपर्कातील व्यक्तीने घातपात केल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर कापूसखेड गावातील अशोक पांडुरंग डेळेकर याच्याशी या महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्या दोघांमध्ये झालेल्या फोनवरील संपर्काच्या आधारावर ताब्यात घेतले. पोलिसांना सुगावा लागताच ते त्याच्या घरी गेले, तेव्हा हा आजारी अवस्थेत घरात झोपून होता आणि जणू काहीच झाले नाही अशा अविर्भावात पोलिसांना उत्तरे देत होता. मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने कबुली दिली आणि पैशांच्या मागणीच्या कारणावरून मंगल गुरव यांचा खून केल्याचे सांगितले.'' 

नेहमीच्या नेर्ले आणि बहे गावच्या वेशीवर असलेल्या एका ओढ्याच्या शेजारी हे दोघे गेले होते. त्या ठिकाणी मंगल गुरव यांनी डेळेकरकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. डेळेकर कर्जबाजारी असल्याने हे पैसे देण्यास असमर्थ असावा. त्या विषयावरून दोघांच्यात वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात शेजारील दगड उचलून तिच्या डोक्‍यात घातला. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर मंगलचीच ओढणी तिच्या गळ्यात घालून, डेळेकरने तिला सुमारे पन्नास फूट अंतरावर फरफटत नेले व मृतदेह ओढ्याच्या पात्रात टाकून दिला, अशी माहिती पिंगळे यांनी दिली. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जाधव, प्रवीण साळुंखे, दीपक ठोंबरे, शरद जाधव, अरुण पाटील, शरद, बावडेकर, आलमगीर लतीफ, भरत खोडकर, किरण मुदूर, अमोल सावंत, सचिन सुतार, आनंदा देसाई, शशिकांत माने, विनय माळी, कॅप्टन गुंडेवाड यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला. 


पैशांची मागणी अंगलट आली! 
 

फोनवरून झालेल्या संभाषणावरून मंगल गुरव यांच्या खुनाचा छडा लागला. डेळेकरकडून पन्नास हजार रुपये घेऊन मंगल गुरव आपल्या मुलीला सोन्याचा दागिना करणार होत्या. मात्र ही पैशांची मागणी मंगल गुरव यांच्या अंगलट आली. इस्लामपूर येथील एका विमा कंपनीच्या कार्यालयात त्या सफाई कामगार होत्या. त्यांच्या मागे पती, विवाहित दोन मुली व एमएस्सी करणारा मुलगा असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com